नेटकर्‍याचा 'बाप' काढल्याने ट्वीटर वर चर्चेत आलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं स्पष्टीकरण
Kishori Pednekar | (Photo Credits: ANI)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar)  यांच्या ट्वीटर अकाऊंट वर एका युजरला रिप्लाय देताना आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली होती. त्यावरूनच मागील काही तास चर्चेला उधाण आलं होतं. पण आज सकाळी महापौरांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान ते ट्वीट एका शिवसैनिकांचा राग होता. ही भाषा योग्य नसल्याचं सांगत संबंधित व्यक्तीला समज देण्यात आली आहे तसेच प्रकार समजताच ट्वीट डिलीट केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काल एका वृत्त वाहिनीची मुंबईच्या ग्लोबल टेंडरबाबत बातमी ट्वीट करण्यात आली होती. यावर एका युजरने 'कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं आहे?' असा सवाल विचारला होता. त्याचं उत्तर देताना किशोरी पेडणेकारांच्या अकाऊंटवरून 'तुझ्या बापाला' असा रिप्लाय देण्यात आला होता. आणि यावरूनच गदारोळ सुरू झाला. किशोरी पेडणेकरांनी या प्रकरावर उत्तर देताना हे ट्वीट त्यांनी केलंलं नसून वांद्रे बीकेसीमध्ये कार्यक्रम सुरु असताना त्यांचा मोबाईल एका कार्यकर्त्याकडे होता आणि त्याच्याकडून रागाच्या भरात हा रिप्लाय देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

किशोरी पेडणेकरांच्या अकाऊंट वरून असा रिल्पाय पाहून त्यांचं ट्वीट काही वेळातच डिलीट जरी झाले असले तरीही त्याचे स्क्रिन शॉर्ट्स वायरल झाले. आणि आज अखेर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत या आक्षेपार्ह ट्वीट प्रकरणावर पडदा टाकला आहे.