मुंबई: लेखिका शोभा देशपांडे यांना मराठीत बोलण्याची मागणी करण्यावरून सराफा दुकानात अपमानास्पद वागणूक; 20 तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर मालकाने मागितली माफी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबईमध्ये कुलाबा भागात महावीर ज्वेलर्स मध्ये मराठी बोलण्याचा आग्रह धरण्याच्या कारणावरून शोभा देशपांडे या लेखिकेला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप लेखिकेने केला आहे. दरम्यान या निषेधार्थ या शोभा देशपांडे (Shobha Deshpande) या लेखिका काल (8 ऑक्टोबर) रात्रीपासून दुकानाबाहेर ठिय्या आंदोलनावर बसल्या आहेत. लेखिकेने केलेल्या आरोपानुसार, दुकानातील व्यक्ती त्यांच्याशी हिंदीमध्ये संभाषण करत होत्या. त्यावेळेस त्यांनी मराठी बोलण्याचा आग्रह केला मात्र दुकानातील व्यक्तींनी मराठीत बोलणार नाही सोबतच दागिनेही देणार नाही असं म्हटलं आहे. यानंतर पोलिसांच्या मदतीने त्यांना दुकानाबाहेर ढकलण्यात आले असा दावा देखील त्यांनी केला आहे.

दरम्यान काही वेळापूर्वीच महावीर ज्वेलर्सचे मालक दुकानात आले. त्यांनी मोडक्या तोडक्या मराठीमध्ये शोभा देशपांडे यांची भेट घेऊन माफी मागितली आहे. यावेळेस मनसे नेते संदीप देशपांडे देखील तेथे उपस्थित होते. मागील 20 तासांपासून शोभा देशपांडे उपाशी असल्याने सध्या त्यांना नजिकच्या रूग्णालयात नेण्यात आले आहे. तेथे त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल.

शोभा देशपांडे कालरात्रीपासून याप्रकारानंतर महावीर ज्वेलर्स दुकानाबाहेर दोन मराठी पुस्तकं घेऊन ठिय्या आंदोलनावर बसल्या आहेत. काही वेळापूर्वीच मनसे नेते संदीप देशपांडे तेथे पोहचले आहेत. त्यांनी शोभा देशपांडे यांची भेट घेतली आहे सारा प्रकार जाणून घेतला आहे. दरम्यान त्यांनी मीडियाशी बोलताना शोभा देशपांडेंची माफी मागण्याची आणि याप्रकारामध्ये पोलिसांनी जबाबदारीने प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे. आज सकाळी महावीर ज्वेलर्सच्या मालकाने शोभा देशपांडे यांची भेट घेतली आणि त्यांची माफी मागितली.

शोभा देशपांडे यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार हा संतापजनक असल्याचं सांगत त्यांच्यासोबत माराठी भाषेचा अपमान असल्याचं सांगितलं आहे. शोभा देशपांडे यांनी थरारक सत्य इतिहास आणि इंग्रजी इंडिया हाच आपला खरा शत्रू या दोन पुस्तकांचं संकलन केलं आहे. त्या एक वृत्तपत्रही चालवत होत्या.