व्हॉट्सअॅप प्रातिनिधिक फोटो (Photo Credits: Pixabay)

एकमेकांशी संपर्कात राहण्याचे उत्तम माध्यम म्हणून व्हॉट्सअप कडे पाहिले जाते. किंबहुना व्हॉट्सअॅप (WhatsApp) सध्या काळाची गरज बनला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मात्र हाच व्हॉट्सअॅप मुंबईतील रविंद्र दुसांगे यांची डोकेदुखी बनला आहे. इतकंच नव्हे तर जिवंतपणी त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. ऐकून धक्का बसला ना! पण असंच घडले आहे. हयात असलेले रविंद्र दुसांगे यांच्या निधनाचे व्हायरल व्हॉट्सअॅप मेसेजेस पाहून रविंद्र च्या पायाखालची जमीनच सरकली. इतकच नव्हे तर चक्क त्याच्या कुटूंबियांना त्याच्या नातेवाईकांकडून आणि मित्रपरिवाराकडून श्रद्धांजलीचे मेसेज येण्यास, कॉल्स येण्यासही सुरुवात झाली.

जवळपास 3 ते 4 दिवस हा प्रकार सुरु होता.

अखेर कंटाळलेल्या, त्रस्त झालेल्या रविंद्र दुसांगेंनी (Ravindra Dusange) पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केली. रविंद्र दुसांगे हे मुंबईतील दहिसर भागात राहतात. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, रविंद्र च्या कुटूंबाला जवळपास 400 श्रद्धांजलीचे मेसेज आले. त्यामुळे रविंद्र यांना चिंता होती की, जर हे मेसेज त्यांच्या आजारी असलेल्या आईला मिळाला तर तिचे काय होईल. या भीतीने या भयंकर अशा मेसेजला रोख लावण्यासाठी रविंद्र यांनी दहिसर पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केली.

हेही वाचा- SBI WhatsApp Fraud: ग्राहकांना सावधानतेचा इशारा! व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारा अनेक ग्राहकांची अकाऊंट्स धोक्यात

रविंद्रच्या भावाने त्यांना हा व्हायरल मेसेज पाठवला. त्याआधी त्यांना या गोष्टीची भणक सुद्धा नव्हती. इतकच नव्हे तर या मेसेज मध्ये दुसांगेचा फोटो सुद्धा होता. त्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन हा फोटो घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या संपुर्ण प्रकरणात रविंद्र दुसांगेंनी संशयित व्यक्तीची नाव पोलिसांना सांगितले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. कलम 66A,IT अॅक्टच्या अंतर्गत यााबाबतीत तक्रार दाखल करण्यात आली असून ही बदनामी केल्याचे प्रकरण आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.