Image For Representation (Photo Credits: Facebook)

स्वच्छतागृहामध्ये (Ladies Washroom) गेलेल्या एका महिलेचा व्हिडिओ (Video) काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना दक्षिण मुंबईच्या (Mumbai) एका रेस्टॉरंटच्या स्वच्छतागृहामध्ये घडली आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात (Azad Maidan Police Station) गुन्हा दाखल झाला असून आरोपीला गुरुवारी अटक करण्यात आली होती. मात्र, त्याला आज कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

समीर शेख असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला गुरुवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास आरोपी काम करत असलेल्या मोबाईल दुकानाच्या जवळील एका रेस्टॉरंटच्या स्वच्छतागृहामध्ये गेली होती. त्यानंतर आरोपीने स्वच्छतागृहाच्या दरवाजाच्या खाली असलेल्या जागेतून मोबाईल फोन घातला. मात्र, त्यावेळी कोणीतरी मोबाईलच्या माध्यमातून रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तक्रारदार महिलेच्या लक्षात आले. त्यानतंर महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. महिलेचा आवाज ऐकताच रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनी धावत येऊन आरोपीला पकडले. दरम्यान, महिलेने मुंबई पोलीस कंट्रोल रुमला यासंदर्भात माहिती दिली. या घटनेची माहिती होताच आझाद पोलीस ठाण्यातील एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आणि फिर्यादी दोघांना ठाण्यात घेऊन गेले. त्यावेळी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याचा फोन जप्त करण्यात आला. मात्र, शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला जामीन मंजूर करण्यात आली आहे. हे देखील वाचा- बीड: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर 27 वर्षीय तरुणाने तलवारीने केला जीवघेणा हल्ला, तरुणी गंभीर जखमी

याआधी ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी छत्तीसगडहून मुंबईला आलेल्या एका मुलीवर पनवेलमध्ये एका रिक्षा चालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली समोर आली होती. आरोपी रिक्षाचालकाने पीडित मुलीला डोक्यात दगड टाकण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला होता. ही घटना पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत कोळीवाडा स्मशानभुमीच्या बाजूला घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती. याप्रकरणी पोलिसांनी 12 तासात आरोपीला अटक केली होती.