अशोक चव्हाण यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट, तपशील गुलदस्त्यात
Ashok Chavan called on Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credits-ANI)

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची राजभवन (Raj Bhavan) येथे भेट घेतली आहे. अशोक चव्हाण यांनी राज्यपालांची नेमकी भेट कोणत्या कारणास्तव घेतली हे अद्याप पुढे आले नाही. मात्र, गेल्या काही काळापासून अशोक चव्हाण हे काही कारणामुळे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या राज्यपाल भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी राज्यपालांची घेतलेली भेट कोणत्या खास कारणास्तव नाही. तर ती केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत विरोधी पक्षाचे नेते राज्यपालांना भेटत होते. मात्र, सत्ताधारी पक्षातील मंत्री व्यक्तिगतरित्या राज्यपालांना जाऊन भेटण्याच्या घटना तशा फारशा घडल्या नाहीत. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या भेटीचे नेमके कारण काय? याबाबत अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, विधानसभेचे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अनुक्रमे देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर तसेच, भाजपचे अनेक नेते, खासदार या आधी राज्यपालांना जाऊन भेटलेले आहेत. प्रत्येक वेळी भाजप नेत्यांनी सरकार विरोधी मुद्दे घेऊन राज्यपालांना भेटल्याचे दाखवले आहे. मात्र, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील कोणी मंत्री क्वचितच राज्यपालांना जाऊन भेटले आहेत.