मुंबई मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर ग्रॅन्ड रोड ( Grant Road) आणि मुंबई सेंट्रल (Mumbai Central) स्टेशन दरम्यान 13 तासांचा जम्बो ब्लॉक (Jumbo Block) जाहीर करण्यात आला आहे. यामुळे फास्ट लोकल्सची (Fast Local) सेवा विस्कळीत राहण्याचा अंदाज आहे. 8 फेब्रुवारी- 9 फेब्रुवारी च्या रात्री दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. देखभालीचं काम शनिवार रात्री 10 वाजल्यापासून रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू असल्याने हा ब्लॉक घेतला जाईल. या ब्लॉक दरम्यान काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत तर काहींच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी हे बदल लक्षात घेऊन शुक्रवार शनिवारी प्रवासाचं आयोजन करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
ब्लॉक दरम्यान फास्ट लाईन वरील अप आणि डाऊन मार्गावरील सेवा स्लो लाईन वर चालवली जाणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ही सेवा स्लो लाईन वर चालणार आहेत. मार्गातील बदलांव्यतिरिक्त, अनेक उपनगरीय गाड्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे. शिवाय, चर्चगेटवरून निघणाऱ्या अनेक गाड्या वांद्रे आणि दादर स्थानकांवरून कमी केल्या जातील किंवा उलट चालवल्या जातील.
दैनंदिन कामकाजातील व्यत्यय कमी करण्यासाठी हे काम रात्रभर केले जाणार आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम देखील केले जाणार आहे.