Mumbai local | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) शहरामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊन आता स्थिती पुन्हा सामान्य करण्यास सुरूवात झाली आहे. कोरोनाचा फैलाव नियंत्रणात ठेवण्यासाठी एकीकडे आरोग्य प्रशासन काम करत असताना मिशन बिगिन अगेन अंतर्गत चाकरमान्यांना कामावर पुन्हा रूजू होण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान मुंबईची ओळखचं मुंबई लोकल (Mumbai Local) आहे. सध्या मुंबई लोकल मधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची मुभा आहे. परंतू असे असूनही शहरात मुंबई लोकलमध्ये गर्दी असल्याचं आढळून आलं आहे. मुंबई लोकलमध्ये गर्दी टाळत सोशल डिस्टंसिंग (Social Distancing) पाळण्याचे आवाहन करत आज (24 सप्टेंबर) पासून मध्य रेल्वेने (Central Railway) 68 अधिक फेर्‍या चालवत असल्याची घोषणा केली आहे. Western Railway Special Suburban Train: मुंबईतील नागरिकांच्या सेवेसाठी 350 ऐवजी 500 गाड्या येत्या 21 सप्टेंबर पासून धावणार, पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय.

मध्य रेल्वे कडून मुंबई लोकलच्या आतापर्यंत 355 फेर्‍या चालवल्या जात होत्या. मात्र त्यामध्ये अजून 68 नव्या फेर्‍यांची वाढ करण्यात आल्याने आता एकूण फेर्‍या 423 करण्यात आल्या आहेत. दरम्यान मुंबईमध्ये कल्याण, डोंबिवली, बदलापूर येथून येणार्‍यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. अद्याप सामान्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. सध्या केवळ पत्रकार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, बॅंक, बॉम्बे हाय कोर्ट, सरकारी कर्मचारी यांना प्रवासाची मुभा आहे. सोबतच मुंबईत अंतिम वर्षाच्या परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनाही ऑफलाईन परीक्षा देणार असल्यास ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे.

मध्य रेल्वे ट्वीट

मध्य रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रेल्वे गाड्यातील वाढती गर्दी पाहता फेर्‍या वाढवल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता सामान्यांनी लोकल प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळणं, मास्कचा वापर करणं, हात स्वच्छ धुणं, स्टेशन परिसरात सरकारने जारी केलेल्या नियमांचे पालन करणं आवश्यक आहे.