Mumbai Local Train | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई लोकलच्या (Mumbai Local) दुरूस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी टप्प्याटप्प्याने तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जातो. 16 एप्रिलच्या रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील ब्लॉक रद्द केला असला तरीही मेन लाईन वरील माटुंगा- मुलूंड जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. त्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केल्यानंतर हार्बर मार्गावरचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांचा महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्यांना तो प्रदान केला जाईल. या कार्यक्रमासाठी अनेकजण खारघरला येणार आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. नक्की वाचा: Maharashtra Bhushan Award: नवी मुंबई येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आयोजन; कार्यक्रमानिमित्त 15 व 16 एप्रिल रोजी वाहतुकीत बदल, घ्या जाणून .

मुंबई लोकल मेगाब्लॉक अपडेट

पश्चिम रेल्वेवर वसई यार्डमध्ये रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२ ते शनिवारी पहाटे ३.३०पर्यंत ब्लॉक घेऊन काम करण्यात आल्याने आता रविवारी (16 एप्रिलला) दिवसा पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नसेल. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजून 5 मिनिटं ते 3 वाजून 5 मिनिटं या वेळेत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील तर काही उशिराने धावतील.

आता महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना हार्बर रेल्वेने सुरळीत प्रवास करता येईल. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या सहकार्याबद्दल मध्य रेल्वेचे आभार मानले आहेत.