Mumbai Local (Photo Credits: PTI)

कोविड-19 (Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली लोकलसेवा (Local Service) सर्वसामान्य मुंबईकरांसाठी केव्हा सुरु होणार, या प्रतिक्षेत अनेकजण आहेत. या सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. सर्वांसाठी लोकलसेवा सुरु करण्याबाबत या आठवड्यात घोषणा होणार असून यासाठी सरकार 'चेन्नई पॅटर्न'चा (Chennai Pattern) अवलंब करणार असल्याची बोलले जात आहे. या पॅटर्ननुसार, महिलांना पूर्णवेळ आणि उर्वरीत प्रवाशांना गर्दीची वेळ वगळता प्रवास करण्याची परवानगी देण्यात येण्याची शक्यता आहे.

चेन्नई पॅटर्न म्हणजे महिलांना पूर्ण वेळ आणि पुरुषांना मर्यादीत वेळेत लोकल प्रवासाची मुभा. या संदर्भातील प्रस्ताव आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. सर्वप्रथम अत्यावश्यक सेवेतील लोकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात महिलांना लोकल प्रवासाची मुभा मिळाली. आता गर्दीची वेळ टाळून सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु करण्याची दाट शक्यता आहे. (Mumbai Local For General Public: मुंबई लोकल सेवा सर्व मुंबईकरांसाठी सुरु होण्याची शक्यता, लवकरच होणार निर्णय)

मुंबईतील कार्यालयांच्या वेळा पूर्वीप्रमाणेच आहेत. या वेळेत धावणाऱ्या लोकलची संख्या मर्यादीत असल्यामुळे प्रवाशांना लोकलसेवा मिळूनही प्रवास करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप नोंदवत सर्वसामान्यांसाठी लोकल खुली करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. महिलांना पूर्ण वेळ, सामान्यांना गर्दी नसलेली वेळ, सर्वांसाठी पूर्ण वेळ आणि रात्री 10 ते सकाळी 7 या काळात सामान्य प्रवाशांना हे चार पर्याय लोकल प्रवासासाठी देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्या पर्यायावर शिक्कामोर्तब करतील यावर सर्वसामान्यांचा लोकल प्रवास अवलंबून आहे. त्याचबरोबर मध्य आणि पश्चिम रेल्वेला पूर्ण क्षमतेने गाड्या सुरु करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल खुली होण्याचे संकेत दिसू लागले आहेत.

दरम्यान, गेल्या मार्चपासून सुरु झालेल्या कोविड-19 संकटावर मुंबईसह राज्याने मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवले आहे. तसंच लसीबद्दलही दिलासादायक माहिती समोर येत आहेत. त्यामुळेच सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे.