Mumbai Local Trains | Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: ANI)

कोविड-19 संकटाच्या (Covid-19 Pandemic) पार्श्वभूमीवर केवळ आरोग्यसेवक (Health Workers) आणि फ्रंटलाईन वर्कर्संना (Frontline Workers) लोकल (Local) प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. आता वकीलांचाही फ्रंटलाईन वर्करमध्ये समावेश करत त्यांना मुंबई लोकल (Mumbai Local) प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. यासोबतच कोर्टातील क्लार्क देखील लोकल प्रवास करु शकणार आहेत. मात्र यासाठी लसीकरण पूर्ण होणे अनिवार्य आहे.

वकील संघटनेकडे लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच संघटना वकिलांना पासच्या मंजुरीसाठी प्रमाणपत्र देणार आहे. हे प्रमाणपत्र तिकीट खिडकीवर दाखवून पास किंवा तिकीट मिळवता येईल, अशी माहिती महाधिवक्त्यांनी हायकोर्टात दिली आहे. यामुळे वकील आणि कोर्टातील क्लार्क यांचा लोकल प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. (Mumbai Local: लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवास करता येणार? मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले संकेत)

सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा कधी मिळणार? लस घेऊन घरात बसाव लागतं असेल तर लसीकरणाचा उपयोग काय? सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाबद्दलही असे प्रश्नही हायकोर्टाने यावेळी उपस्थित केले. तसंच सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाबाबत गांभीर्गायने विचार करण्याबाबतही सरकारला सांगितले.

कोर्टाच्या या प्रश्नांवर उत्तर देताना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा सरकारचा मानस असल्याचे महाधिवक्ता म्हणाले आहेत. तसंच गुरुवारपर्यंत भूमिका स्पष्ट करु असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

दरम्यान, कोविड-19 संकटामुळे दीड वर्षांपासून मुंबई लोकल्स सर्वसामान्यांसाठी बंद आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे लस घेतलेल्यांना तरी लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी विरोधी पक्षांकडून वारंवार होत आहे. त्याचबरोबर नागरिकांची देखील तीच भावना आहे. राज्य सरकारने हायकोर्टात दिलेल्या माहितीनुसार, लवकरच सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता आहे.