लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करण्यासोबत लोकलचं वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे-दिवा (Thane-Diva) मध्ये मार्गिका 5 आणि 6 च्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेकडून (Central Railway) चालना दिली जात आहे. यासाठी रविवार (19 डिसेंबर) दिवशी सुमारे 18 तासांचा मेगाब्लॉक घेतला जाण्याची मध्य रेल्वेची तयारी सुरू आहे. या कामामुळे मुंबईकरांच्या लोकलच्या आणि अनेक लांब पल्ल्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
मागील 10 वर्षांपासून ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरू आहे. ही मार्गिका पूर्ण करण्याचं काम पार पाडावं म्हणून अनेकदा मुदतवाढ दिली होती पण काही तांत्रिक अडचणी, भूसंपादन यामुळे ही अंतिम मुदतवाढ पुढे जात राहिली आहे. सप्टेंबर महिन्यातही या मार्गिकेसाठी असाच 10 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. नव्या मार्गिकेचं काम करताना ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा अशी अनेक तांत्रिक कामं देखील केली जाणार आहे. हे देखील वाचा: दिवा स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना क्षणाच्या फरकाने वाचला तरुणाचा जीव; मध्य रेल्वे ने शेअर केला थरारक व्हिडीओ .
सध्या या मार्गिकेचं संपवण्यासाठी जानेवारी 2022 ची डेडलाईन ठरवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या रविवारी सकाळी 8 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत असा 18 तासांचा मेगाब्लॉक घेतला जाऊ शकतो. तत्पूर्वी मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त पाहणी करणार आहेत.त्यांच्या मंजुरीनंतर ब्लॉक घेतला जाईल. यामध्ये धीम्या मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवून किंवा फास्ट ट्रॅक वर वळून केवळ फास्ट ट्रॅक सेवा सुरू ठेवली जाण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या विकेंडला बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर जरा जपूनच आणि पर्यायी मार्गांचा विचार करूनच प्लॅन बनवा.