मुंबईत पश्चिम रेल्वे (Western Railway) लोकल (Mumbai Local) वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रविवारची सुट्टी घेऊन सुरु झालेल्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वे सवा विस्कळीत झाल्याची माहिती आहे. दहिसर ते बोरिवली दरम्यान ही वायर तुटल्याचे सांगितले जात आहे. त्याचा परिणाम बोरिवलीवरुन मुंबईकडे येणाऱ्या जलदगती मार्गावरील लोकल रेल्वे सेवांवर परिणाम झाला आहे. मुंबई लोकल (Mumbai Local) ही मुंबईची नस समजली जाते. त्यामुळे त्यात काही बिघाड झाल्यास अवघ्या मुंबईचीच गती मंदावते.
ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम तातडीने सुरु असून लवकरच ते पूर्ण केले जाईल. त्यानंतर काहीच वेळात वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहितीही पश्चिम रेल्वेने दिली आहे. वाहतूक सुरु झाली तेव्हा पहाटे साडेपाच वाजलेपासूनच दहिसर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान काही तांत्रिक बिघाड असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. नेमका बिघाड काय आहे जाणून घेतल्यानंतर ओव्हरहेड वायर तुटल्याचे पुढे आले. हा बिघाड दूर करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, जलदगती मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याने धिम्या मार्गावरील लोकल वाहतूकीवर ताण आलाआहे. धिम्या लोकलने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. अनेक स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी जमल्याचे पाहायला मिळत आहे. चर्चगेट हे पश्चिम रेल्वे मार्गावरील एक मोठे आणि महत्त्वाचे स्टेशन. या परिसरात सरकारी आणि खासगी कंपन्यांचीही मोठी कार्यालये आहेत. या शिवाय इतरही संस्थांची मोठीच कार्यालये या परिसरात पाहायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणी लोकल प्रवास करुन येणाऱ्या प्रवाशांचा मोठा फटका बसला आहे.