Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

Mumbai Local:  मुंबईत लोकलने प्रवास करण्यासाठी 15 ऑगस्ट पासून परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मात्र लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेले नागरिकच लोकलने प्रवास करु शकणार आहेत. अशातच 1 लाख 20 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी लोकलचे पास काढल्याची माहिती समोर आली आहे. लोकल मधून प्रवास करण्याची मुभा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा गर्दी वाढेल अशी शक्यता असल्याने फेऱ्या वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या फेऱ्या वाढवण्याच निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सध्या मध्य-हार्बर मार्गावर 1612 फेऱ्या धावल्या जात आहेत. पण त्याच आता वाढवून 1686 फेऱ्या दरदिवशी चालवण्यात येणार असल्याचे जाही करण्यात आले आहे. त्याचसोबत पश्चिम रेल्वेवर सुद्धा 1202 फेऱ्यांऐवजी त्या 1300 फेऱ्या करण्यात येणार आहेत. या लोकल आजपासून धावणार आहेत.(Mumbai Local Train E-Pass: मुंबई लोकल ट्रेनचा Universal Travel Pass मिळवण्यासाठी epassmsdma.mahait.org वर कसा अर्ज करायचा? येथे मिळवा संपूर्ण माहिती)

दरम्यान, राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मुंबई लोकल, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल आणि दुकानांबाबत महत्वाची घोषणा केली होती.त्यानुसार हॉटेल रेस्टॉरंट आणि दुकानदारांना मोठा दिलासा देण्यात आला होता. त्यानुसार, राज्यात  कालपासून हॉटेल, दुकाने, मॉल आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. यामुळे व्यापारी कोरोनाच्या दीर्घकाळ र्निबधांनंतर राज्यातील व्यावसायिकांना आजपासून व्यवसायाचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

तसेच खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी 200 जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी आसन क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेने परवानगी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असेल तर, 100 टक्के उपस्थितीने काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयांना 24 तास चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, एका सत्रात 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी असणार आहे.