Photo Credit- X

मुंबईच्या (Mumbai) मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी, 11 मे 2025 रोजी, तर पश्चिम रेल्वे मार्गावर 10 व 11 मेच्या रात्री मेगा ब्लॉक असणार आहे. रुळ, सिग्नलिंग आणि इतर पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी हे मेगा ब्लॉक जाहीर केले आहेत. त्यामुळे उद्या घराबाहेर पडताना मुंबईकरांना त्यानुसार नियोजन करावे लागेल. पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक माहीम व सांताक्रूझ दरम्यान अप आणि डाऊन लोकल लाईन्ससाठी असेल. हा ब्लॉक रात्री 1 ते (11 मेच्या पहाटे) पहाटे 4.30 पर्यंत असेल. ब्लॉक दरम्यान चर्चगेट/मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ दरम्यान अप-डाऊन सेवा जलद मार्गावर चावल्या जातील. डाऊन मार्गावर महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड येथे थांबे नसतील. अप मार्गावर माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परेल आणि महालक्ष्मी येथे थांबे नसतील.

मध्य मार्गावर 11 मे रोजी माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 पर्यंत ब्लॉक असेल. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा धीम्या मार्गावर वळवल्या जातील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील.

यासह ठाण्यावरून सकाळी 11.03 दुपारी 3.38 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंडनंतर धीम्या मार्गावर वळवल्या जातील. पुढे त्या माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. (हेही वाचा: Mumbai Metro Line 9 Update: प्रतीक्षा संपली! 10 मे पासून मुंबई मेट्रो लाईन 9 मीरा-भाईंदर कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याची चाचणी; लवकरच जनतेसाठी सुरु होणार सेवा)

हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान मेगा ब्लॉक असेल. या ब्लॉकचा कालावधी सकाळी 10.40 ते दुपारी 4.40 असा आहे. याकाळात सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/ पनवेलदरम्यान अप आणि डाउन लोकल फेऱ्या रदद् राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व पनवेल-वाशी-पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

दरम्यान, मेगा ब्लॉक ही रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आवश्यक प्रक्रिया आहे. यामध्ये रुळांची दुरुस्ती, सिग्नलिंग यंत्रणेची तपासणी, ओव्हरहेड वायर्सची देखभाल आणि इतर अभियांत्रिकी कामांचा समावेश आहे. मात्र या मेगा ब्लॉकमुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवांवर मोठा परिणाम होईल, विशेषतः रविवारी दुपारच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर. प्रवाशांना पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करावा लागेल.