Mumbai Local Mega Block Update: मुंबई लोकलचा आज मध्य आणि हार्बर, पश्चिम मार्गावर मेगा ब्लॉक
Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणजे मुंबई लोकल (Mumbai Local) ! पण रविवारी देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी तिला काही काळासाठी सेवेपासून दूर ठेवलं जातं. रविवार हा सुट्टीचा वार असल्याने अनेकजण फिरण्यासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतात. पण आज घराबाहेर पडताना प्रवासाचं नियोजन करूनच बाहेर पडा. मध्य (Central Line) आणि हार्बर रेल्वे मार्गावर (Harbour Line) आज मेगा ब्लॉक (Mega Block) जाहीर करण्यात आला आहे. मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक होणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी येथून सुटणार्‍या फास्ट लोकल्स सकाळी 10.25 ते 3.35 या वेळेमध्ये माटुंगा ते मुलूंड दरम्यान डाऊन स्लो मार्गावरून वळवल्या जातील. तर ठाण्याच्या पलिकडे फास्ट लोकल मुलुंड स्थानकामध्ये डाऊन फास्ट मार्गावर वळवल्या जाणार आहेत. ठाण्यावरून देखील 10.50 ते 3.45 दरम्यान अप फास्ट मार्गावरील ट्रेन्स मुलुंड आणि माटुंगा स्थानकादरम्यान अप स्लो मार्गावर वळवल्या जाणार आहेत. वेळापत्रकानुसार, त्याचे थांबे असतील. माटुंगा येथे अप फास्ट मार्गावर त्या पुन्हा वळवल्या जातील. ब्लॉक दरम्यान गाड्या 10-15 मिनिटं उशिराने धावण्याची शक्यता आहे.

वडाळा रोड-मानखुर्द अप आणि डाउन हार्बर मार्गावर देखील सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. सीएसएमटी कडून सकाळी 10.03 ते दुपारी 3.54 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी साठीच्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.40 ते दुपारी 3.28 या वेळेत सीएसएमटी कडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद असणार आहेत. तर मेगाब्लॉक मध्ये सीएसएमटी आणि वांद्रे/गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 पर्यंत ट्रान्सहार्बर/मेन लाइनवरून प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.

पश्चिम रेल्वे द्वारे रेल्वे ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी बोरीवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.35 ते 3.35 या 5 तासांसाठी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.