मुंबईची लाईफलाइन लोकल ट्रेन दर विकेंडला देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी काही तासांसाठी बंद ठेवली जाते. या दरम्यान महत्त्वाची कामं टप्प्याटप्प्याने केली जातात. यंदाच्या 27 ऑगस्टच्या रविवारी, ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे वर वसई रोड ते वैतरणा दरम्यान शनिवारी रात्री ब्लॉक घेतला जाईल त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवासांची यंदाच्या रविवारी दिवसा मेगाब्लॉक मधून सुटका झाली आहे.
मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर रेल्वेच्या रूळांच्या कामासाठी आणि अन्य देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक घेतला जाणार असल्याने ट्रेन उशिराने धावणार आहेत. काही लोकल फेर्या रद्द देखील करण्यात आल्या आहेत.
मद्य रेल्वे मार्गावर सकाळी 10.40 ते 3.40 दरम्यान ब्लॉक असणार आहे. या वेळेत जलद लोकल स्लो ट्रॅक वर चालवल्या जाणार आहेत. तर हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर, ठाणे ते पनवेल, नेरूळ ते ठाणे, नेरूळ ते खारकोपरदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकलफेऱ्या बंद राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी, ठाणे ते वाशी आणि बेलापूर ते खारकोपरदरम्यान लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत. हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 दरम्यान ब्लॉक असणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर मध्यरात्री 11.50 ते पहाटे 4.30 पर्यंत ब्लॉक असेल. या वेळेत विरार-भरूच मेमू रविवारी पहाटे ४.३५ऐवजी ४.५० वाजता विरार स्थानकातून रवाना होईल. तर रात्री उशिराच्या काही लोकल फेर्या रद्द असणार आहेत.