रविवारी (9 जुलै) रोजी मध्य रेल्वेकडून मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्या ठाणे ते विद्याविहार दरम्यान डाउन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच या गाड्या वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटं उशिरा पोहचणार आहेत. त्यामुळे रविवारच्या दिवशी जर तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर रेल्वेचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात येत आहे. (हेही वाचा - Maharashtra Weather Alert: येत्या 24 तासांत राज्यात पावसाचा जोर वाढणार, कोकणाला रेड अॅलर्ट)
मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे अप आणि डाऊन पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर रविवारी सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या डाऊन आणि अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहार दरम्यान डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर रविवारी सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप-डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या माहीम ते सांताक्रूज अप आणि डाऊन हार्बर मार्गावर शनिवार-रविवार रात्री 11.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉकदरम्यान, सर्व डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून वळवण्यात येतील.