मुंबई लोकल (Photo Credit : PTI)

मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे लोकलसेवेचा (Mumbai Railway) आपण अगदी दररोज लाभ घेतो. त्यामुळे तिची डागडुजी करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हे डागडुजीचं काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून दर आठवड्याला रविवारी मेगा ब्लॉक घेतला जातो. या रविवारी (9 डिसेंबर) तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक (Megablock) घेण्यात आला आहे. यामुळे लोकल फेऱ्यांची संख्या कमी होणार असून काही रेल्वे लोकल्स 15-20 मिनिटे उशिराने धावतील. म्हणूनच रविवारी बाहेर पडणार असलात तर या बदललेल्या वेळा लक्षात घ्या. अन्यथा खोळंबा होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वे

मुलुंड ते माटुंगा दरम्यान सकाळी 11.10 ते 3.40 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. मात्र या लोकल्स नेहमीच्या स्थानकांसोबतच भांडुप, विक्रोळी आणि शीव या स्थानकांवर थांबतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान धावणाऱ्या लोकल्स 15 मिनिटे उशिराने धावतील.

पश्चिम मार्ग

पश्चिम रेल्वेमार्गावर सकाळी 10.35 ते 3.40 या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल उशिराने धावणार आहेत.

हार्बर मार्ग

कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11.10 ते 3.40 यावेळेत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक असेल. यामुळे सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशी आणि पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटी या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र या काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल मार्गावर विशेष लोकलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना मेगाब्लॉक दरम्यान ट्रान्स हार्बर आणि मध्य मार्गारून त्याच तिकीट किंवा पासावर प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.