मुंबईमधील (Mumbai) प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी. जर तुम्ही रविवारी (26 मार्च) घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर लोकल (Mumbai Local) रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच तुमचा कार्यक्रम ठरवा. रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) असणार आहे. पश्चिम रेल्वेबाबत बोलायचे झाले तर बोरिवली ते जोगेश्वरी दरम्यान ओव्हरहेड वायरिंग आणि सिग्नलिंगचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे बोरिवली ते जोगेश्वरी स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत जंबो ब्लॉक ठेवण्यात आला आहे.
हार्बर लाईनबद्दल बोलायचे झाले तर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणारी पनवेल-बेलापूर-वाशी सेवा आणि सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 पर्यंत वाशी-बेलापूर-पनवेल वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द असतील.
मेगाब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि वाशी-पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा सुरू करण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान, हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे ठाणे-वाशी मार्गे नेरुळपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल. ही परवानगी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत असेल.
मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.30 ते 2.45 वाजेपर्यंत डाऊन ट्रॅक फास्ट लोकल ठाण्याहून कल्याणकडे धिम्या मार्गाने जातील. या लोकल गाड्या त्यांच्या वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबण्याबरोबरच कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकावरही थांबतील आणि वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिरा धावतील. (हेही वाचा: Maharashtra Heat Update: महाराष्ट्रात यंदा उष्णतेने मोडला विक्रम, IPCC ने वर्तवली दुष्काळाची शक्यता)
सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 या वेळेत कल्याणहून अप जलद मार्गावर धावणाऱ्या लोकल कल्याण ते ठाणे या धिम्या मार्गावर धावतील. या गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकावरही थांबतील. त्यानंतर या गाड्या पुन्हा जलद मार्गावर येतील. या लोकल ट्रेनही त्यांच्या नियोजित वेळेपासून 10 मिनिटे उशिराने धावतील.