Mumbai Local (photo credits: Commons.Wikimedia)

Central, Western and Harbour Railway Mega Block: मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल आठवडाभर प्रवाशांच्या दिमतीला वेळेत रहावी म्हणून दर रविवारी मेगा ब्लॉक घेऊन काही मेंटेनन्सची कामं केली जातात. या आठवड्यात मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (western Railway) मार्गावर खास मेगा पॉवर ब्लॉक  घेऊन दुरूस्तीची कामं केली जाणार आहेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार शनिवार (11 मे) च्या मध्यरात्रीपासूनच या कामांना सुरूवात होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो या विकेंडला बाहेर पडणार असाल तर मुंबई लोकलच्या 11 आणि 12 मेच्या विकेंडच्या ट्राफिक - पॉवर ब्लॉक आणि मेगा ब्लॉकचं वेळापत्रक (Mega Block Time Table) पाहूनच बाहेर पडा.

  • मध्य रेल्वे

कुर्ला ते शीव पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मार्गावरील कुर्ला ते शीव स्थानकांदरम्यान उद्या शनिवारी मध्यरात्री 12.45 ते पहाटे 6.15 दरम्यान पॉवर ब्लॉक असेल. पावसाळ्यात रुळांना वर घेता यावे यासाठी या दोन स्थानकांतील जुनी सिग्नल गॅण्ट्री काढून नवीन लोखंडी साचा बसविण्यासाठी 140 टन वजनाच्या रोड क्रेन आणून मध्यरात्री हे काम केले जाणार आहे.

मध्य रेल्वेची धिमी अप आणि डाऊन तसेच जलद अप आणि डाऊन असे चार मार्ग तसेच हार्बरचे अप-डाऊन अशा एकूण 6 मार्गिका बंद राहणार आहेत. परिणामी सीएसएमटी ते कुर्ला दरम्यानची वाहतूक बंद राहील. मध्य मार्गावरील शेवटची सीएसएमटी-अंबरनाथ लोकल रात्री 12.05 वाजता सोडण्यात येईल.

ठाणे ते कल्याण ब्लॉक

ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान १२ मे म्हणजे रविवारी ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे ठाणे ते कल्याण डाउन धिम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि दिवा ते ठाणे सीएसएमटी दिशेकडील मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. सकाळी 10.52 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत कल्याण दिशेकडील लोकल जलद मार्गावरून धावतील. त्यामुळे या लोकल कळवा, मुंब्रा आणि ठाकुर्ली या स्थानकांवर थांबणार नाहीत. सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावरील लोकल सकाळी 10.53 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत जलद मार्गावर धावतील. त्यामुळे मुंब्रा, कळवा या स्थानकांवर थांबणार नाहीत.

  • पश्चिम रेल्वे मेगा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते माहिम स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडून धावणार्‍या धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सांताक्रुझ ते माहिम स्थानकादरम्यान विरार दिशेकडील धिम्या मार्गावर जाणाऱ्या लोकल जलद मार्गावरून धावतील. महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड या स्थानकांवर त्या थांबणार नाहीत. तर लोअर परळ, माहिम आणि खार स्थानकावर फलाटाची लांबी कमी असल्याने येथे लोकल 2 वेळेस थांबेल.

हार्बर रेल्वे

मानखुर्द ते वडाळादरम्यान रात्री ब्लॉक

मानखुर्द ते वडाळादरम्यान रात्री साडेपाच तासांचा ब्लॉक असेल. ब्लॉक काळात या मार्गावरून बेलापूर दिशेकडे जाणारी शेवटची लोकल शनिवारी मध्यरात्री12 वाजून 05 मिनिटांची सीएसएमटी ते बेलापूर असेल. रात्री 11 वाजून 13 मिनिटांची पनवेल ते सीएसएमटी लोकल शेवटची लोकल चालविण्यात येईल. त्यानंतर रात्री लोकलसेवा बंद असेल.

मध्य आणि पश्चिम मार्गावर 11 आणि 12 मे दिवशी हाती घेण्यात आलेल्या दुरूस्तीच्या कामांमुळे रविवारी भुसावळ मुंबई पॅसेंजर, इंद्रायणी एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस, मनमाड राज्यराणी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस या लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.