Mumbai Lift Accident: लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन आदळली, 62 वर्षीय महिला जागीच ठार
Lift Accident | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

मुंबई (Mumbai News) शहरातील निवासी इमारतीची लिफ्ट आदळून (Mumbai Elevator Accident) झालेल्या अपघातात 62 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. नगीना अशोक मिश्रा असं या मृत महिलेचं नाव आहे. ही घटना 21 ऑक्टोबर रोजी गोराई चारकोप (Gorai Charkop) परिसरातील हायलँड ब्रिज नामक निवासी इमारतीत घडली. लहान भावासोबत लपाछपी खेळत असताना लिफ्टमध्ये (Mumbai Lift Accident) डोके अडकून 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यीच धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. या घटनेमुळे सुरु झालेली सुरक्षेची चर्चा कायम असतानाच आता हे नवी घटना पुढे येत आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वत्तानुसार, गोराई चारकोप परिसरात एक बहुमजली निवासी इमारत आहे. या इमारतीमध्ये रहिवाशांच्या सोईसाठी एक लिफ्ट आहे. या लिफ्टचा वापर करुन नगीना अशोक मिश्रा ही 62 वर्षीय वृद्ध महिला मॉर्निंग वॉकसाठी निघाली होती. दरम्यान, ही लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन कोसळली आणि खाली आदळली. या घटनेमुळे लिफ्टमध्ये अडकलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा, Lift Accident: भावासोबत लपाछपी खेळताना मुंबईतील तरुणीचा लिफ्ट अपघात, जागीच मृत्यू)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला चौथ्या मजल्यावरून खाली जात असताना चौथ्या आणि तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट अडकली. लिफ्ट अडकल्याचे लक्षात येताच नगिना मिश्रा यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून मदतीसाठी आलेल्या तिच्या मुलाने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, लिफ्टचा दरवाजा उघडण्याच्या प्रयत्नात असताना त्याला विजेचा धक्का बसला तो कोसळला. त्यातच वीजपुरवठा सुद्धा बंद झाला.

दरम्यान, इमारतीच्या एका सुरक्षा रक्षकाने नंतर लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र लिप्ट वेगाने खाली कोसळली आणि खाली जाऊन ती जमीनीवर आदळली, असे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली आहे.

लिफ्ट अपघाताची घटना घडलेल्या गोराई चारकोप परिसरातील हायलँड ब्रिज इमारतीतील रहिवाशांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात अपघाताची गंभीरता कथन केली आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, लिफ्टचा अपघात इतका जबरदस्त होता की, लिफ्टच्या तळाला दोन मोठी छिद्रे पडली होती. या छिद्रांमुळे नगिना मिश्रा गंभीर जखमी झाल्या. नगिना मिश्रा यांचा मृत्यू विजेचा धक्का बसून झाला असावा असा अंदाज सुरुवातीला बांधण्यात येत होता. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना उपचाराआधीच मृत घोषीत केले. दरम्यान, वैद्यकीय अहवालानुसार नगिना यांचा मृत्यू विजेच्या धक्क्यामुले नव्हे तर नगीना मिश्रा यांचा मृत्यू हा लिफ्ट वेगानं खाली आदळल्यानं जखमी होऊन झाला असल्याचे पुढे आले.