
मुंबईतील केईएम रुग्णालयातून (KEM Hospital) उपचार केलेल्या एका नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने सदर मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईककडून करण्यात आला आहे. तसेच रुग्णलयातील डॉक्टरांच्या विरोधात वरळी पोलिसात तक्रार दाखल केली असून याचा पुढील तपास सुरु आहे.
केईएम या शासकीय रुग्णालयात विविध ठिकाणाहून लोक उपचार घेण्यासाठी येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून उपचार योग्य न मिळत असल्याने मृत्यू ओढावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात अजून एक भर पडली असून रुग्णालयातून उपचार घेऊन घरी गेलेल्या मुलाचा दोन दिवसातच मृत्यू झाला आहे. तत्पूर्वी डॉक्टरांनी उपचार केलेल्या मुलाला मोठ्या आकाराची गोळी दिली होती. ती गोळी दुधासोबत घेण्यास सांगितले होते. मुलाने ती गोळी घेताच त्याच्या घशामध्ये अडकल्याने अस्वस्थ वाटू लागले. यामुळे सदर मुलाला उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
याबाबत रुग्णालयाचे अधिष्ठता देशमुख यांनी स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, सदर मुलाला नातेवाईकांनी मृत अवस्थेत रुग्णालयात घेऊन येण्यात आले. तर पोलिसांना याबाबत कळवले असता त्यांनी तक्रार दाखल केली आहे. तसेच मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच केईएम रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बालकाला शॉर्टसर्किटचा धक्का लागल्याने त्याचा हात कापल्याचा भयंकर धक्कादायक प्रकार घडला होता. तसेच बालकाचा चेहरा सुद्धा एका बाजूने भाजला गेल. या सर्व प्रकारामुळे बालकाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाच्या या भोंगळ कारभाराच्या विरोधात संताप व्यक्त केला होता. मात्र अखेर त्या बाळाचा सुद्धा मृत्यू झाला होता.