मुंबई लोकलच्या फे-या वाढवाव्यात; मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या सूचना
Mumbai Local And Mumbai High Court (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र अनलॉकच्या टप्प्यात हळूहळ लॉकडाऊनचे नियम शिथील करत येथील नागरिकांचे जीवन पुन्हा पूर्वपदावर आणत आहेत. मात्र आता मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल (Mumbai Local) अद्याप सामान्य नागरिकांसाठी सुरु झालेली नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य लोकांसाठी ही सेवा सुरु झालेली नाही. त्यामुळे लोकल रेल्वेच्या फे-या देखील कमी आहेत. मात्र यामुळे सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे अवघड जात आहे. यामुळे मुंबई लोकलच्या फे-या वाढवाव्यात अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) राज्य सरकारला (State Government) दिल्या आहेत.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारने अनलॉक 5 च्या टप्प्यात अनेक सेक्टर खुली केली आहेत. अशा परिस्थितीत मुंबई लोकल रेल्वेच्या फे-या देखील वाढविण्यात याव्या असे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा- Mumbai Local Updates: मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावरील ट्रेन्समध्ये गर्दी टाळण्यासाठी आजपासून 68 अधिक फेर्‍या वाढवल्या; सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं आवाहन

अनलॉक 5 च्या टप्प्यात मॉल्स, हॉटेल्स मार्गदर्शक तत्वांसह सुरु झाली आहेत. तसेच सरकारी कार्यालयेही 100% क्षमतेने सुरु झाली आहेत. अशा परिस्थितीत रेल्वेमधून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या वाढू शकते. त्याच धर्तीवर ही गर्दी टाळण्यासाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या फे-या वाढवाव्यात असे न्यायालयाकडून राज्य सरकारला सांगण्यात आले आहे.

यामध्ये मध्य रेल्वेवरील लोकल फे-यांची संख्या 600 आणि पश्चिम रेल्वेची 700 करावी असे सांगण्यात आले आहे. आम्ही राज्य सरकारला निर्देश देऊ शकत नाही मात्र त्यांनी सामान्य नागरिकांचा विचार करून या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देईल असे न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान मुंबई मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर 28 सप्टेंबर पासून 2 महिला विशेष (Ladies Special) आणि 4 अन्य फेर्‍या वाढवल्या आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील विशेष लोकल विरार- चर्चगेट- विरार (Virar - Churchgate - Virar) मार्गावर चालवली जाणार आहे. दरम्यान विरार वरून सकाळी 7.35 ला विशेष गाडी सुटेल ती चर्चगेटला 9.22 ला पोहचेल तर संध्याकाळी चर्चगेटवरून 6.10 ला सुटणारी लोकल 7.55 ला पोहचणार आहे. यासोबत विरार अप-डाऊन मार्गामध्ये 6 फेर्‍या धीम्या मार्गावर देखील वाढवल्या जाणार आहेत.