Mumbai: आता रेल्वे स्टेशनवर होणार हेअरकट, दाढी आणि स्पा; मुंबईच्या CSMT स्थानकामध्ये उभे राहत आहे Unisex Salon
Salon (Photo Credits: Pixabay)

आता चक्क रेल्वे स्थानकामध्ये (Railway Station) तुम्ही हेअरकट, दाढी करून घेऊ शकणार आहात. तसेच महिला स्पा किंवा पेडीक्योर अशा सेवा घेऊ शकणार आहेत. हे सर्व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) या युनेस्कोच्या जागतिक वारसा रेल्वे स्थानकाच्या आवारात होणार आहे. मुंबईला पुढील दोन महिन्यांत सीएसएमटी येथे रेल्वेच्या आवारात पहिले वातानुकूलित युनिसेक्स सलून-कम-स्पा (Unisex Salon-cum-Spa) कॉर्नर मिळेल. त्यानंतर कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस याठिकाणीही अशी सेवा सुरु होईल. या 'पर्सनल केअर सेंटर'चे काम सुरू झाले आहे.

लोकल ट्रेनने सीएसएमटीला दररोज येणाऱ्या-जाणाऱ्या अनेक लोकांनी तिकीट बुकींग खिडक्यांजवळील चौकात हिरव्या कापडाने आच्छादलेले एक ठिकाण पहिले असेल, हेच ते सलून आहे. उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना विभक्त करणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या मध्ये ही जागा आहे. शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मुंबई), मध्य रेल्वे यांनी सांगितले की, सीएसएमटी आणि लवकरच इतर स्थानकांवर सुरु होणारी ही कल्पना मनोरंजक असून, त्यामुळे प्रवाशांना नक्कीच फायदा होईल.

सीएसएमटी येथील हे सलून येत्या 2-3 महिन्यांत सुरू होण्याची अपेक्षा आहे. मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, सीएसएमटी आणि कुर्ला एलटीटी स्थानकांवर 'पर्सनल केअर सेंटर'चे बांधकाम, ऑपरेशन, देखभाल आणि व्यवस्थापनाचे कंत्राट विजया इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना नॉन-फेअर महसूल मॉडेल अंतर्गत पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी, सीएसएमटी येथे वार्षिक 14,77,000 रुपये आणि कुर्ला एलटीटी येथे वार्षिक 4,94,000 रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा: Mumbai: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये Yoga चे धडे; प्रवाशांनी बसल्या जागीच केली विविध आसने)

याठिकाणी परवानाधारकाला आपत्कालीन, जेनेरिक आणि आयुर्वेदिक औषधे, सौंदर्यप्रसाधने इत्यादी वस्तूंची विक्री करण्याची परवानगी दिली जाईल. बॉडी मसाज चेअरद्वारे मसाजची सुविधा, पात्र फिजिओथेरपिस्टद्वारे फिजिओथेरपी, सलून सेवा जसे की- केशभूषा, शेव्हिंग, फेशियल इ. गोष्टी रेल्वे वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असतील. उतार सुविधांमध्ये मसाज, पेडीक्योर, मॅनिक्युअर यांचाही समावेश आहे. महत्वाचे म्हणजे हे सलून 24 तास खुले असेल, जेणेकरुन लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सीएसएमटी स्थानकातून येणारे आणि निघणारे प्रवासी रात्री उशिरा या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.