![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/08/death.jpg?width=380&height=214)
गेल्या काही दिवसांत, महाराष्ट्रात गिलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत 64 वर्षीय महिलेची जीबीएसची पहिली घटना नोंदवली गेली. तसेच, आता मुंबईत जीबीएसमुळे पहिला मृत्यूही नोंदवला गेला आहे. 53 वर्षीय व्यक्तीचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात एकूण 197 जीबीएस रुग्णांची नोंद झाली आहे, ज्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएस हा एक दुर्मिळ आजार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते, ज्यामुळे कमजोरी आणि पक्षाघात होऊ शकतो. आरोग्य विभाग या घटनांवर लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक ती उपाययोजना करत आहे.
मुंबईमध्ये या आजाराने मृत्यू झालेली व्यक्ती ही वडाळा येथील रहिवासी होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) बीएन देसाई रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत असलेल्या या रुग्णाला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु अखेर या आजाराने त्याचा मृत्यू झाला.
दुसरीकडे, पुणे महानगरपालिकेने वाढत्या जीबीएस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना राबवून कारवाईदेखील केली आहे. अधिकाऱ्यांनी पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेड गाव, धायरी आणि जवळच्या भागात असलेले 30 खाजगी पाणीपुरवठा प्रकल्प सील केले आहेत. हे भाग या प्रादुर्भावाचे केंद्र म्हणून ओळखले गेले आहेत. संयंत्रांमधून गोळा केलेले पाण्याचे नमुने वापरासाठी अयोग्य असल्याचे आढळल्यानंतर ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. (हेही वाचा: Paneer In Hotels Made From Vegetable Oil: 'राज्यातील अनेक हॉटेल्समध्ये मिळणारे पनीर हे दुधापासून नव्हे, तर वनस्पती तेलापासून बनलेले असते'; मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांचा दावा)
दरम्यान, जीबीएस ही स्थिती प्रामुख्याने स्नायूंच्या हालचाली, स्पर्श, तापमान आणि वेदनांसाठी जबाबदार असलेल्या नसांवर परिणाम करते. यामुळे स्नायू कमकुवत होणे, पाय आणि हातांमध्ये संवेदना कमी होणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास किंवा गिळण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. जीबीएसचे नेमके कारण जरी अद्याप अस्पष्ट असले तरी, ते बहुतेकदा पूर्वीच्या विषाणूजन्य किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गाशी, लसीकरणाशी किंवा मोठ्या शस्त्रक्रियांशी निगडीत असल्याचे दिसून आले आहे.