Covid-19 Restrictions: मुंबई मध्ये तुर्तास कडक निर्बंध नाहीत- पालकमंत्री अस्लम शेख
Aslam Shaikh (Photo Credits: ANI)

कोविड-19 तिसरी लाट (Covid-19 Third Wave) आणि मागील काही दिवसांपासून वाढणारी कोरोना रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर नवनव्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. आगामी सण-उत्सवाच्या काळासाठी देखील विशेष नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळेच पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू होणार अशा चर्चा रंगल्या आहेत. अशा परिस्थितीत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Mumbai Guardian Minister Aslam Sheikh) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. तुर्तास कडक निर्बंध लागू होणार नाहीत. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र  सप्टेंबर अखेपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर कडक निर्बंध लागू होणार असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे नाईट कर्फ्यू, संचारबंदी लागू करण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसंच केंद्र सरकारकडूनही नाईट कर्फ्यू लागू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र तुर्तास तरी नाईट कर्फ्यू, संचारबंदीची गरज नसल्याचं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. (मुंबईकरांना येत्या आठवड्यात कोविड निर्बंधांमधून अधिक शिथिलता मिळेल; टास्क फोर्स कडूनही मुख्यमंत्र्यांना शिफारसी : पालकमंत्री अस्लम शेख)

सप्टेंबर अखेरपर्यंत कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता टास्क फोर्सनं वर्तवली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली तर कडक निर्बंध लागू करण्यात येतील.  परंतु, राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास कडक निर्बंधांची आवश्यकता भासणार नाही, असंही शेख म्हणाले. मात्र रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध कडक होणार, असा इशाराही त्यांनी दिला. तसंच सध्या अनेक ठिकाणी गर्दी वाढत आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.