Mumbai-Goa Vande Bharat Train Trial Run: कोकणवासियांना मिळणार 'वंदे भारत' ट्रेनचं गिफ्ट? आज मुंबई-गोवा मार्गावर ट्रायल रन
Vande Bharat Train | (File Image)

कोकणवासियांना लवकरच वंदे भारत ट्रेनची (Vande Bharat Train) भेट मिळण्याची शक्य्ता आहे. आज मुंबई-गोवा (Mumbai Goa) मार्गावर वंदे भारत ट्रेनची चाचणी होणार आहे. जर ही चाचणी यशस्वी ठरली तर कोकणातही आता वंदे भारतने प्रवास करता येणार आहे. सध्या मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते साई नगर शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा 3 मार्गावर वंदे भारत धावत आहे. त्यामध्ये आता चौथ्या वंदे भारत ट्रेनची भर पडण्याची शक्यता आहे.

वंदे भारत ही सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. कोकण मार्गावर सध्या सगळ्यात वेगवान तेजस एक्सप्रेस धावत आहे. पण ती जर्मन बनावटीची आहे. वंदे भारत ही भारतीय बनावटीची ट्रेन आहे. या ट्रेन मधील सुसज्ज व्यवस्था सामान्यांना विमानप्रवासाप्रमाणे दिल्या जाणार्‍या सुविधा यामुळे या ट्रेनचं खास आकर्षण आहे.

मुंबई-गोवा रेल्वे मार्गावर मागील महिन्यातच इलेक्ट्रिफिकेशनचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे आता वंदे भारतच्या चाचणीकडे प्रशासन अधिकारी वर्गाचे लक्ष लागले आहे. वंदे भारत ही ट्रेन कमाल 180 किमी प्रति तास वेगाने धावू शकते. या अ‍ॅडव्हान्स ट्रेन मध्ये जीपीएस बेस्ड पॅसएंजर इन्फॉर्मेशन सीस्टम, बायो व्हॅक्युम टॉयलेट्स, अ‍ॅटोमेटिक दरवाजे, वायाफाय आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम आहे. नक्की वाचा: Vande Bharat Train: वंदे भारत सेमी हायस्पीड एक्स्प्रेस मुंबई-गोवा मार्गावर धावणार; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती .

मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक दरम्यानच्या सर्वात उंच घाटांवर चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या या पहिल्या श्रेणीतील गाड्या कोणत्याही सपोर्टिंग इंजिनशिवाय धावत आहेत.