Vande Bharat Train: वंदे भारत सेमी हायस्पीड एक्स्प्रेस मुंबई-गोवा मार्गावर धावणार; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती
महाराष्ट्रातील आमदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची 3 फेब्रुवारी रोजी भेट घेतली. या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते गोवा दरम्यान धावणार असल्याची माहिती दिली.
Vande Bharat Train: मुंबई-गोवा मार्गावर (Mumbai-Goa Route) लवकरच वंदे भारत सेमी-हाय स्पीड एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील आमदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची 3 फेब्रुवारी रोजी भेट घेतली. या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते गोवा दरम्यान धावणार असल्याची माहिती दिली.
मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर नुकत्याच सुरू झालेल्या गाड्यांच्या धर्तीवर ही एक्स्प्रेस मुंबई ते गोवा दरम्यान चालवण्यात येणार असल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले. मुंबई-गोवा रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून पाहणीनंतर नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय मंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. शिष्टमंडळाने ठाणे आणि कोकण विभागातील रेल्वेच्या अनेक मुद्द्यांवर मंत्र्यांशी भेटीदरम्यान चर्चा केली. (हेही वाचा -Vande Bharat Express Schedule And Fare: वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर मार्गावर सुरू, जाणून घ्या ट्रेनचे वेळापत्रक आणि दर)
दरम्यान, यावेळी रेल्वे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या नातेवाइकांना स्टॉलचे वाटप, शेतकऱ्यांसाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर मोबाईल स्टॉल्स, प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे आदी उपाययोजना करण्याबाबतही चर्चा झाली.
सावंतवाडी-दिवा रेल्वे सेवा दादरपर्यंत वाढवणे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) योजनेंतर्गत रेल्वे रुळांवर राहणाऱ्यांचे पुनर्वसन आदी मुद्द्यांवर शिष्टमंडळाने दानवे यांच्याशी चर्चा केली. ठाण्यातील मुंब्रा स्थानकाचे नाव बदलून मुंब्रा देवी स्थानक करावे, अशी मागणीही आमदारांनी केली. यासंदर्भात राज्य सरकारने प्रस्ताव सादर केल्यानंतर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दानवे यांनी दिले.
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2023 06:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

