Maharashtra State Transport Corporation Shivshahi Bus | (Photo Credits: MSRTC)

नववर्ष आणि ख्रिसमसच्या सुट्ट्या यावरून कोकणात जाणारी पर्यटकांची गर्दी पाहता एसटी मंडळाकडून खास मुंबई-गोवा शिवशाही एसी बस (Mumbai-Goa Shivshahi AC Bus) सुरू केली होती. या वातानुकुलित बससेवेला मिळालेला प्रवाशांचा प्रतिसाद पाहता ही सेवा कायम ठेवण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे एसटी प्रशासन आता मुंबई सेंट्रल (Mumbai Central) ते पणजी (Panaji) पर्यंत खास वातानुकूलित एसी बससेवा सुरू ठेवणार आहे. या बससेवेचं भाडं 1245 रूपये आहे. शिवशाही ही 43 सीटर एसी बस आहे. सुट्ट्यांच्या काळात खाजगी बसच्या तुलनेत हे भाडं कमी असल्याने प्रवाशांची त्याला पसंति होती.

न्यू इयर सेलिब्रेशन मध्ये या शिवशाही एसी बसला नऊ दिवसांमध्ये 4 लाखांपेक्षा अधिकचं उत्पन्न मिळालं होतं. 2 जानेवारीला एका दिवसामध्ये 70 हजारांची कमाई या बसने कमावले होते. 23 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली शिवशाही एसी बससेवा आता कायम राहणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा आहे. सुट्ट्यांच्या दिवसांत खाजगी बसचे अव्वाच्या सव्वा भाडे आणि ट्रेनला लागणारी लांबच लांब वेटिंग लिस्ट यामुळे शिवशाहीकडे अनेक जण वळले होते.

मुंबई -गोवा मार्गावर चालवलेली ही केवळ 9 दिवसांची बस आता मुंबई-पुणे- कोल्हापूर मार्गे गोवा अशी चालवावी यासाठी देखील प्रवाशांकडून मागणी होत आहे.