मुंबई: घाटकोपर मधील पूर्व-पश्चिम जोडणारा पूल पूर्वसुचनेशिवाय बंद, नागरिक सहन करतायत वाहतूक कोंडीचा त्रास
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

मुंबई (Mumbai) मधील घाटकोपर (Ghatkopar) येथील पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल महानगरपालिकेने (BMC) पूर्वसुचनेशिवाय आज (31 मे) दुपार पासून बंद करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी पूर्व-पश्चिमेला जोडणारा हा पूल धोकादायक असल्याने बंद करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा पुल सुरु करण्यात आला होता. मात्र आज दुपार पासून घाटकोपरमधील हा पूल अचानकपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस प्रचंड वाहतुक कोंडी झालेली दिसून येत आहे.(डोंबिवली: पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा पूल 27 मे पासून बंद, डोंबिवलीकरांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागणार)

यापूर्वी सुद्धा गेल्यावर्षी जुलै महिन्यात सुद्धा हा पुल धोकादायक असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु त्यानंतर अद्याप कोणतेही काम महानगरपालिकेकडून करण्यात आलेले नाही. मात्र आज कोणतेही दुरुस्तीचे काम नसतानासुद्धा अचानकपणे घाटकोपरमधील पूर्व-पश्चिम पूल बंद करण्यात आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.