Mumbai: अग्निशमन दलाच्या ताफ्तात दाखल होणार कोट्यावधींची नवी गाडी; इमारतीच्या 50 मजल्यापर्यंत आग विझवण्यास सक्षम
Fire Brigade Vehicle | Representational Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबई (Mumbai) मधील वाढत्या उंचच उंच इमारतींची संख्या लक्षात घेऊन अग्निशमन दलाने (Fire Brigade) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. उंच इमारतींमधील आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला एक खास वाहन मिळणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या वाहनाची किंमत 2.2 कोटी इतकी असून यामधील वॉटर पंप 50 मजल्यापर्यंत आगीवर पाणी सोडू शकतो.

सध्या अग्निशमन दलाकडे असलेल्या वाहनांमधील वॉटर पंप फक्त 12 व्या मजल्यापर्यंत पोहचू शकतात. त्यापेक्षा वरील मजल्यावर आग लागली असल्यास अजून एक पंप बसवण्यात येतो. 10 हजार लीटर क्षमता असलेला वॉटर पंप 300 लीटर पाणी प्रत्येक मिनिटाला सोडतो. परंतु, अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी येणाऱ्या अडचणींमुळे त्यावर विविध मार्ग शोधले जात आहेत.

या नव्या वाहनाची तपासणी चालू आहे, असे अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हे वाहन विकत घेण्यासाठीचा प्रस्ताव 6 महिन्याआधी स्थायी समितीकडून घेण्यात आला होता. या नव्या वाहनामध्ये लागणार पंप फ्रॉन्समधून मागवला गेला आहे. तर इतर साधने राज्यातच बनवली जात आहेत. (हे ही वाचा: प्लास्टीकचा डबा तोंड अडकलेल्या कुत्र्याची अग्निशमन दलाच्या जवानांनी शिताफीने केली सुटका; पहा पुण्यातील घटनेचा वायरल व्हिडीओ)

अतिउंच इमारतींमध्ये आग विझवण्यासाठीचे सर्व सोयी असाव्यात जेणेकरुन त्वरीत आग विझवण्यास मदत होईल. परंतु, ही यंत्रणा अयशस्वी ठरल्यास अशा उंच इमारतींवरील आग विझवण्यासाठीचे साधन अग्निशमन दलाकडे असणे गरजेचे आहे. या नव्या वाहनाचा वापर करुन झोपडपट्टीमधील आग सुद्धा लवकरात लवकर विझवण्यास यश येईल.

सध्या अग्निशमन दलाकडे असलेल्या साधनांमध्ये सर्वात उंच शिडी ही 90 मीटरची असून ऑगस्ट 2015 मध्ये यास मान्यता मिळाली होती. या शिडीचा वापर करुन 30 मजल्यापर्यंत अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहचू शकतात.