महिला व्यावसायिकाकडून खंडणी (Extortion) मागितल्या प्रकरणी सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) आणि निलंबित पोलिस निरीक्षकासह तीन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी तक्रारदाराच्या भावाला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करून कारवाईपासून वाचवण्यासाठी आणि जामीन मिळवून देण्याच्या नावाखाली 50 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सईदा कुरेशी नावाच्या महिलेने चार महिन्यांपूर्वी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. प्राथमिक तपासानंतर, एसीपी शालिनी शर्मा, निलंबित पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांच्यासह राजू सोनटक्के नावाच्या एका आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.
महत्वाचे म्हणजे शालिनी शर्मा यांना उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले आहे. ज्या चेंबूर पोलीस ठाण्यात शर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, तिथे त्या स्टेशनच्या प्रभारी होत्या. सध्या त्यांना पदोन्नतीनंतर एसीपी म्हणून नागपूरला पाठवण्यात आले आहे, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हे पद स्वीकारता आलेले नाही.
शर्मा आणि इतर आरोपींनी इव्हेंट मॅनेजमेंटशी संबंधित काम करणाऱ्या फिर्यादी कुरेशीकडे यांच्याकडे त्यांचा भाऊ वसीम कुरेशीविरुद्ध गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात, मदत करण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली. शर्मा आणि इतर आरोपींनी कुरेशीकडून सुमारे 24 लाख रुपये घेतले, मात्र त्यांची मागणी सुरूच होती. (हेही वाचा: मुंबईमध्ये एका व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्या प्रकरणी फॅशन डिझायनरसह तीन जणांना अटक, एक आरोपी फरार)
सईदाच्या वकील चित्रा साळुंखे यांनी सांगितले की, आरोपींनी कुरेशीला धमकी दिली होती की जर तिने 50 लाख रुपये दिले नाहीत तर ते तिच्या भावाविरुद्ध एकामागून एक एफआयआर दाखल करत राहतील आणि त्याला तुरुंगातून बाहेर पडू देणार नाहीत. गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासानंतर आरोपींविरुद्ध खंडणी व छळाच्या आरोपाखाली आयपीसीच्या कलम 389, 385, 506 आणि 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.