Extortionist's Wealth in Bank Lockers: खंडणीखोराचे तब्बल 14 कोटी रुपयांचे घबाड 'बँक लॉकर'मध्ये; बहिणीच्या जबाबात धक्कादायक माहिती
Extortion Bank Lockers | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

हिरेन रोमी भगत याची बहीण रुपाली भगत हिने त्याची तब्बल 14 कोटी रुपयांची संपत्ती बँक लॉकरमध्ये ठेवल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. धक्कादायक म्हणजे हिरेन भगत हा अंमलबजावणी संचालनालयाचे (Enforcement Directorate) नाव सांगून खंडणीचे रॅकेट चालवत असे. ज्याच्या माध्यमातून त्याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केली आहे. पोलिसांच्या गुन्हे अन्वेशन शाखेने हिरेन भगत आणि त्याच्या साथीदारांविरोधात खंडणी प्रकरणी 360 पानी आरपपत्र बुधवारी दाखल केले. पलिसांनी आरोपपत्रात दावा केला आहे की, हिरेन भगत हाच खरा खंडणी रॅकेटमधील मास्टरमाईंड आहे. व्हाईट कॉलर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या नागरिकांना खंडणी मागण्यासाठी तो नियोजन करत असे आणि त्यानुसार कृती करत असे.

 

अंमलबजावणी संचालनालयाचे (Enforcement Directorate) नाव सांगून चालवलेल्या खंडणीच्या रॅकेटमध्ये मिळवलेली कोट्यवधी रुपयांची संपत्ती बँक लॉकरमध्ये सुरक्षीत ठेवल्याची कबूली आरोपीच्या बहिणीने दिली आहे. रुपाली भगत, असे या महिलेचे नाव आहे. ती खंडणी आणि इतर विविध गुन्ह्यांमध्ये प्रमुख आरोपी असलेल्या हिरेन रोमी भगत याची बहिण आहे. त्याच्या सांगण्यावरुनच ही संपत्ती बँक लॉकरमध्ये ठेवल्याची माहिती रुपाली हिने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिली. तिने सांगीतले की आपण बँकेच्या दोन लॉकरमध्ये 13.68 कोटी रुपयांची सोने आणि पैसे लपवून ठेवले होते. (हेही वाचा, MLM Scheme Fraud Case: मल्टी लेव्हल मार्केटिंग स्कीम फसवणूक प्रकरण; KBC कंपनीची 84 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता जप्त)

दुसऱ्या बाजूला हिरेन याची बहिण रुपाली भगत ही आकाश गुप्ता याची जवळची मैत्रिण आहे. गुप्ता हा खंडणी रॅकेटमधील एक आरोपी आहे. त्याने साक्ष दिली की, तक्रार दाखल केलेल्या एका विकासकाला 164 कोटी रुपयांच्या मोठ्या मागणीचा भाग म्हणून 25 लाख रुपये देण्यास भाग पाडले गेले. भगत यांच्या विरोधात पीएमएलए खटल्याची चौकशी करत असताना अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी गुप्ता यांच्या घराची झडती घेतली. सहआरोपी अमेय सावेकर यानेही भगतच्या खंडणी रॅकेटबाबत पुष्टी करणारे निवेदन दिले.

आरोपपत्रातील माहितीनुसार भगत याच्यावर धमकावणे, खंडणी वसूल करणे, गुन्हेगारी धमकी देणे या आरोपांखाली भारतीय दंड संहिता कलम 120 बी अन्वये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यासोबतच लोकसेवक म्हणून तोतयागिरी करणे या आरोपाखाली आयपीसीच्या 170 मधील आणखी दोन कलमे आणि शस्त्र कायदा कलम 30 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप आहे की, त्याने ईडी अधिकारी असल्याचे सांगून खंडणी मिळवली. तसेच, शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन करत MP-5 स्वयंचलित बंदुका खरेदी केल्या. ज्याचा वापर त्याने बांधकाम व्यवसायिकांना धमकाविण्यासाठी केला.