Dharavi slums in Mumbai. (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांना वारंवार लॉकडाउन संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. येत्या 31 मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर मुंबईतील धारावीत आज कोरोनाचे नवे 47 रुग्ण आढळून आले असून एकही बळी गेला नाही आहे. त्यामुळे आतापर्यंत धारावीत कोरोनाचे संक्रमण झाल्याचा आकडा 1425 वर पोहचल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

धारावीत दाटीवाटीने वस्ती असून तेथे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे थोडे अशक्यच आहे. तरीही महापालिकेकडून कोरोनाच्या संदर्भात तेथे सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात आहे. धारावी सध्या कंन्टेंटमेंट झोन मध्ये असून तेथे कोणत्याही कामांना परवानगी दिली नाही आहे. तसेच नागरिकांना घराबाहेर पडण्यास सुद्धा मनाई असून पोलिसांकडून धारावीत बंदोबस्त लावण्यात आला आहे. यापूर्वी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील दाटीवाटीच्या ठिकाणी ड्रोनची नजर असणार असल्याचे स्पष्ट केले होते.(पालघर येथे आणखी 10 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण आकडा 434 वर पोहचला)

दरम्यान, मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार गेला आहे. तर मुंबई सध्या रेड झोनमध्ये असून तेथे लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र ग्रीन झोनसाठी लवकरच नियम शिथील करण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. तसेच राज्यात कोरोना व्हायरसचा वेग संथ करण्यास यश आले असून त्याची साखळी अद्याप तुटलेली नाही असे ही त्यांनी म्हटले आहे.