Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता घरात थांबून कोरोनाच्या विरोधात लढा देताना घराबाहेर पडताना सुद्धा काळजी घ्यावी अशी विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे आणि राज्य हे कोरोनाच्या विखळ्यात अडकल्याने त्यांना रेड झोन घोषित करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई आणि पुणे अव्वल स्थानी असून तेथे कोरोनाग्रस्तांसह बळींचा आकडा वाढत आहे. याच दरम्यान आता मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. धारावीत (Dharavi) आज नवे 27 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने आकडा 1541 वर पोहचला आहे. तसेच आजच्या दिवसात 2 जणांनी कोरोनामुळे जीव गमावल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.(Coronavirus: महाराष्ट्रात एकूण 50 हजार 231 कोरोनाबाधित; राज्यात दिवसभरात 3 हजार 41 रुग्णांची नोंद तर, 58 जणांचा मृत्यू)

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी येत्या काही काळात कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट होणार आहे. परंतु राज्य सरकार त्यासाठी सक्षम असून त्याबाबत तयारी केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचसोबत कोरोनाची गुणाकाराने वाढ होत असल्याने चिंता सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात 31 मे नंतर संपणार का हे आता सांगू शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मात्र कोरोनाशी कशा प्रकारे यशस्वी लढा दिला जाईल याकडे अधिक भर देण्यात येणार आहे. तसेच सर्दी, खोकला, ताप यांसोबतच थकवा, तोंडाची चव जाणे किंवा वास न येणे ही देखील कोरोनाची प्राथमिक लक्षणे असू शकतात. त्यामुळे तातडीने डॉक्टरांशी संपर्क करा, असे मुख्यमंत्र्यांनी कळकळीचे आवाहन केले आहे. (मुंबईतील धारावीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी 4 हजार 407 खाटांची क्षमता असणारे अलगीकरण विभागाची सुविधा उपलब्ध)

दरम्यान, महाराष्ट्रात आज नवे 3041 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 58 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 50231 वर पोहचला आहे. त्यापैकी 33988 जण अॅक्टिव्ह असून एकूण 1635 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 14600 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.