मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 6 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2649 वर पोहचला, महापालिकेची माहिती
Coronavirus (Photo Credits: PTI)

मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून हजारोंच्या संख्येने नव्याने रुग्णांची भर पडत आहे. यामुळे प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. मात्र कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न आणि खबरदारी घेण्यात येत आहे. याच दरम्यान, मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचे आणखी आज (13 ऑगस्ट) 6 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2649 वर पोहचल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यापैकी 2300 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 90 अॅक्टिव्ह रुग्ण धारावीत सद्यच्या घडीला आहेत.(महाराष्ट्रातील खासगी लॅबमध्ये COVID19 च्या चाचणीसाठी नागरिकांना 300 रुपये कमी मोजावे लागणार) 

धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाच्या सुरुवातीला नियंत्रण मिळवणे फारच कठीण होते. परंतु आता धारावीतील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास यश आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. त्याचसोबत या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून नव्याने कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.(पालघर शहरात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता येत्या 14 ते 18 ऑगस्ट पर्यंत पूर्णपणे लॉकडाऊनचे आदेश)

महाराष्ट्रात कोविड-19  चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आणि कोविड योद्धा अहोरात्र झटत आहेत. राज्यात काल  दिवसभरात 12,712 रुग्णांची वाढ झाली असून 344 रुग्ण दगावले आहेत. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 5,48,313 वर पोहोचली असून मृतांची संख्या 18,650 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात 13,408 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 3,81,843 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सद्य घडीला राज्यात 1,47,513 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.