मुंबईकरांचा डबा बंद; डबेवाले निघाले सुट्टीवर; चाकरमान्यांनो पोटाची सोय करा
Dabbawala | (Photo Credit-Wikimedia Commons)

घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मायानगरी मंबई (Mumbai) शहरातील चाकरमान्यांना वेळेवर डबा पोहोचवत काळ, काम, वेग याचे अचूक व्यवस्थापन करणारे मुंबईचे डबेवाले सुट्टीवर (Mumbai Dabbawala Vacations) निघाले आहेत. ही सुट्टी सोमवार दिनांक 15 एप्रिल ते 20 एप्रिल अशी चार दिवसांची असेल. त्यामुळे मुंबईकरांना मुंबई डबेवाला (Mumbai Dabbawala Vacations) सुट्टीकाळात आपापल्या डब्याची सोय करावी लागणार आहे. मुंबई डबेवाला असोशिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी ही माहिती दिली आहे.

डबेवाल्यांच्या सुट्टीबाबत बोलताना मुंबई डबेवाला असोशिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी माहिती देताना सांगितले की, डबेवाल्यांची सेवा घेणाऱ्या तमाम ग्राहकांना विनंती करण्यात येत आहे की, 'डबेवाले ज्या गावातून मुंबईला आले ती गावे मुळशी,मावळ,खेड,आंबेगाव, जुन्नर, जिल्हा पुणे तर अकोला, संगमनेर जिल्हा अहमदनगर या भागतील आहेत या भागातील गावात सध्या यात्रेचा मोसम चालू झाला आहे. या यात्रेला डबेवाल्यांना जाणे आवश्यक आहे. म्हणुन डबेवाल्यांनी सोमवार दिनांक १५/४/२०१९ पासून २०/४/२०१९ पर्यंत मुंबईत जेवणाचे डबे पोचवण्याची सेवा बंद ठेवली आहे. (हेही वाचा, डबेवाल्यांसाठी होणार रेल्वे स्थानकाबाहेर सायकल स्टँडची सुविधा)

डबेवाल्यांच्या या सहा दिवसाच्या सुट्टीत महावीर जयंती व गुडफ्रायडे या दोन सरकारी सुट्या आहेत. या दोन सुट्या ६ दिवसाच्या सु्टट्यातुन वगळल्या तर खऱ्या अर्थाने चार दिवसच डबेवाले सुट्टी घेणार आहेत. सोमवार दिनांक २२/४/२०१९ रोजी सकाळी डबेवाला आपल्या ठराविक वेळेत तो कामावर हजर होईल. ग्राहकांना विनंती आहे की या सुट्टीचा पगार ग्राहकांनी कापू नये असे आवाहन आम्ही करत आहोत. बहुतांश शाळा, कॉलेज तसेच काही सरकारी निम सरकारी कार्यालयातील अधिकारी वर्ग उन्हाळ्याच्या सुट्टीवर गेला आहे. त्या मुळे त्यांची सेवा अशी ही बंदच आहे. या मुळे डबेवाल्यांनी घेतलेल्या सुट्टीने ग्राहकांची गैरसोय होणार नाही तरीही काही ग्राहकांची गैरसोय होणार असेल तर त्या बद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत, असेही सुभाष तळेकर यांनी म्हटले आहे.