मुंबईचे डबेवाले 12 आणि 13 जुलै रोजी सुट्टीवर; आषाढी एकादशीनिमित्त घेणार पांडुरंगाचे दर्शन
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit-Wikimedia Commons)

मुंबई लोकल ट्रेन सोबतच मुंबईचे डबेवालेही (Mumbai Dabbawala) मुंबईची लाईफलाईन मानले जातात. अनेक कार्यालये, शाळा, कॉलेजमधील लोक घरातील पौष्टिक अन्न मिळावे म्हणून या डबेवाल्यांवर अवलंबून आहेत. अशात या लोकांची आता दोन दिवस गैरसोय होणार आहे, कारण मुंबईचे डबेवाले 12 आणि 13 जुलै रोजी सुट्टीवर जाणार आहेत. आषाढी एकादशीनिमित्त डबेवाल्यांची ही सुट्टी असणार आहे. ही माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर आणि उल्हास मुके यांनी दिली.

आषाढी आणि कार्तिकी एकादशी हे दोन दिवस डबेवाल्यांसाठी महत्वाचे असतात. या दोन दिवशी हटकून जवळजवळ सर्व डबेवाले विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरी दाखल होतात. त्यामुळे एकादशी आणि द्वादशी असे दोन दिवस डबेवाल्यांची सुट्टी असणार आहे. पंढरपूर इथे डबेवाल्यांची धर्मशाळा आहे. इथे जितके वारकरी राहतील त्यांच्या राहण्याची आणि द्वादशीच्या  जेवणाची सोय विनामूल्य डबेवाल्यांकडून केली जाणार आहे. (हेही वाचा: मुंबईच्या डबेवाल्यांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये 'नो एन्ट्री'; प्रशासनाविरुद्ध शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार)

आषाढी एकादशी नंतर, सोमवार 15 जुलैपासून डबेवाल्यांची ही सेवा पुन्हा सुरु होईल. दरम्यान, मुंबईच्या डबेवाल्यांची ओळख आता जागतिक स्तरावर पोहचली आहे. प्रिन्स हॅरी (Prince Harry) आणि मेघन मार्कल (Meghan Markle) या शाही दामपत्याला पुत्ररत्न झाल्यावर, डबेवाल्यांनी मुंबईइथून बाळंतविडा पाठवला होता. तसेच प्रिन्स हॅरी आणी मेघन यांच्या लग्न सोहळ्यातही डबेवाल्यांनी आवर्जुन मराठमोळा आहेर पाठवला होता.