Mumbai Crime: कांदिवलीत तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु
Representational image (Photo Credit- IANS)

मुंबईतल्या गुन्हेगारीच्या घटनेत सध्या दिवसेंदिवस  वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.  कांदिवलीमध्ये (Kandivali) गोळ्या झाडून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कांदिवलीच्या लालजी पाडा परिसरात ही गोळीबाराची (Kandivali Firing) घटना घडली. ही गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण पहायला मिळाले. या गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळावर कांदिवली पोलिसांनी (Kandivali Police) धाव घेतली आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास हा सुरु आहे.

कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालजी पाडा परिसरात आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या घटनेत गोळी लागल्यामुळे एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलीस या प्रकरणी आता चौकशी करत आहेत.

दरम्यान या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. गेल्या सहा महिन्यातील गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. मृत तरुण या परीसरात टँकरने पाणी विक्रीचा व्यवसाय करत होता. याच व्यवसायाच्या वर्चस्व वादातून त्याची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून पोलीस देखील सध्या त्याच दिशेने तपास हा करत आहे.