मुंबईतील BEST मधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1700 च्या पार
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील बेस्ट (BEST) कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली असून आकडा गुरुवारी 1700 च्या पार गेला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांमधील कोरोनाग्रस्तांचा रिकव्हरी रेट 85 टक्के असून आतापर्यंत 1440 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच काही जणांनी 14 दिवस पूर्णपणे होम क्वारंटाइनच्या नियमाचे सुद्धा पालन केले आहे. कोरोनावर मात केल्यानंतर काही बेस्ट कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. परंतु आता नागरिकांची हळूहळू वाढती गर्दी पाहता कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या युनियन यांनी ड्रायव्हर्ससह कंन्डक्टर्स यांना अधिक सुरक्षा दिली जावी अशी मागणी कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच नियमीतपणे चेकअप सुद्धा करण्यात यावे. बेस्टने 27 बस डेपोमध्ये आयसोलेशन वॉर्ड निर्माण केले पाहिजे. असे युनियनचे प्रमुख शशांक राव यांनी स्पष्ट केले आहे.(COVID-19 Update: महाराष्ट्र पोलिस दलात आढळले 147 नवे कोरोनाचे रुग्ण तर आतापर्यंत 124 पोलिस दगावल्याची माहिती)

दरम्यान, कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून दिवसागणिक हजारोंच्या संख्येने रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु नागरिकांनी कोरोनाच्या काळात स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत मात्र कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्याचे कौतुक केले होते. राज्यातील सर्वच डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांसह कोविड योद्धे सुद्धा सध्याच्या महासंकट काळात आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत.

मुंबईत गुरुवारी 1,200 रुग्णांची भर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1,27,556 वर पोहचला असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बळींचा आकडा 6991 वर गेला आहे. जो आता 7 हजारांच्या नजीकच पोहचला आहे. एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, शहरात दिवसाला 9 हजार कोरोनाच्या चाचण्या करण्यात येतात.