भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीवरून मुंबईतील स्थानिक न्यायालयाने गुरुवारी शिवसेना नेते संजय राऊत यांना समन्स बजावले. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना 4 जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत दावा केला आहे की, राऊत यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या पतीवर बिनबुडाचे आणि पूर्णपणे खोटे आरोप केले आहेत. तक्रारीत म्हटले आहे की, ‘राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेली विधाने अत्यंत बदनामीकारक आहेत. सर्वसामान्यांमध्ये माझी प्रतिमा खराब करण्यासाठी ही विधाने करण्यात आली आहेत.’
सोमय्या यांनी राऊत यांना नोटीस बजावण्याची आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानीच्या आरोपाखाली त्यांच्यावर कारवाई सुरू करण्याची विनंती केली आहे. संजय राऊत यांनी मेधा किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामात किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीने 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे ते म्हणाले होते. (हेही वाचा: Pune: हीच माझ्या कामाची पावती! मनसे नेते निलेश माझिरे यांच्या घरवापसीनंतर वसंत मोरेंचे ट्विट चर्चेत)
दरम्यान, याआधी संजय राऊत यांनी मेधा यांचे पती आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस (INS) विक्रांत प्रकरणात घोटाळ्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, 'भाजप नेत्याने आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी जनतेकडून देणग्या मागितल्या होत्या. या देणगीतून त्यांनी 57 कोटी रुपये जमा केले होते. मात्र ज्या कामासाठी देणगी जमा झाली ते काम पूर्ण झाले नाही आणि किरीट सौम्या यांनी ही रक्कम राज्यपालांकडे जमा करण्याऐवजी पक्ष निधीत जमा करून घेतली. अशाप्रकारे किरीट सोमय्या यांनी खोटे बोलून जनतेकडून पैसे घेतले.