बीएमसीने करवून घेतली स्वच्छताविषयक कामे (Photo Credit : Twitter)

कोरोना विषाणू (Coronavirus) काळात लोकांना जबाबदारीची जाणीव करून देऊनही आणि वेळोवेळी मास्क (Mask) घालण्याचे आवाहन करूनही, काही लोक असे आहेत जे मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे महत्वाचे समजत नाहीत. असे काही निष्काळजी लोक मास्कशिवाय मुंबईच्या अंधेरी भागात फिरत होते, परंतु बीएमसीने (BMC) त्यांना अशी शिक्षा दिली की याची त्यांना आयुष्यभर आठवण राहील. बीएमसीने असा इशारा दिला आहे की, विनामास्क फिरणाऱ्या लोकांनी दंड भरला नाहीत, तर शिक्षा म्हणून त्यांच्याकडून झाडू लावण्यात येईल. बीएमसी अधिकाऱ्यांनी मुंबईच्या अनेक भागांमध्ये या शिक्षेची अंमलबजावणी सुरु केली आहे.

सध्या कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्र सर्वात बाधित राज्य आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात सरकार गेले काही महिने या विषाणूच्या प्रतिबंधासाठी जनजागृती करत आहे. बीएमसी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्या लोकांकडून 200 रुपये दंड वसूल करत आहे. मात्र जे कोणी दंड भरणार नाहीत त्यांना स्वच्छताविषयक कामे, जसे की झाडू मारणे करावी लागतील. अशा लोकांना 1 तासासाठी शहरामध्ये झाडू मारावा लागेल.

ही मोहीम पालिकेच्या सर्व 24 वॉर्डात सुरू करण्यात आली असून मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई सुरू झाली आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले, ‘आम्ही 2 महिन्यांपासून मास्क घालण्याचा नियम काटेकोरपणे लागू करीत आहोत आणि जे लोक मास्क घालत नाहीत त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. या नियमाचे उल्लंघन करून वर दंड न भरल्यास आम्ही अशा लोकांकडून स्वच्छताविषयक कामे करवून घेत आहोत.’

बीएमसीने कोरोना मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांकडून कोविड केअर सेंटर जवळील रस्ता साफ करून घेतला. तसेच काही लोकांना वृद्धांच्या मदतीसाठी नेमले. बीएमसीने आतापर्यंत सुमारे दीड लाख लोकांकडून तीन कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे, परंतु तरीही काही लोक मास्क न घालता फिरत आहेत. बीएमसीचे धीरज बांगर म्हणाले, ‘मास्क न घालणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. इतके सांगूनही लोक मास्क घालत नाहीत. लोकांना मास्कचे महत्व समजावे म्हणून आम्ही त्यांच्यावर कारवाई करत आहोत.’ (हेही वाचा: मुंबईत Mask न घालणाऱ्या 9 हजार जणांच्या विरोधात BMC ची कारवाई, 18 लाखांचा दंड वसूल)

बीएमसी हे सर्व घनकचरा व्यवस्थापन कायद्यांतर्गत करीत आहे. याचा हेतू लोकांकडून पैसे गोळा करणे नसून त्यांना लज्जित करणे हा आहे.