मुंबई महापालिकेकडून मातोश्री बाहेरील 'CM आदित्य ठाकरे' म्हणून लावलेले होर्डिंग्स हटवले
आदित्य ठाकरे यांचे होर्डिंग्स हटवले (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरु झाली आहे. त्यासाठी भाजप-शिवसेना यांनी यंदाच्या विधानसभा निवडणूकीसाठी युती केली. मात्र आता मुख्यमंत्री पद शिवसेनेला (Shiv Sena) मिळावे अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर शिवसेनेचे युवासेना प्रमुख आणि वरळीचे उमेदवार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा विधानसभेत विजय झाल्यानंतर तेच भावी मुख्यमंत्री होणार म्हणून मुंबईतील विविध ठिकाणी त्यांचे होर्डिंग्स झळकवले गेले. त्याचसोबत वांद्रे मधील मातोश्री  (Matoshree) बंगल्याच्या बाहेर सुद्धा आदित्य ठाकरे यांचे होर्डिंग्स लावण्यात आले होते. ते होर्डिंग्स आता मुंबई महापालिकेने काढून टाकले आहेत.

शिवसेना-भाजप युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन वाद सुरु झाल्यानंतर मातोश्री बाहेरील होर्डिंग्स हटवण्यात आले आहेत. शिवसेनेने मुख्यमंत्री पदावरुन 50-50 चा फॉर्म्युल्याची मागणी भाजपकडे केली आहे. मात्र भाजप पुन्हा मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याच्या मतावर ठाम आहेत. तर गुरुवारी शिवसेनेची तातडीची बैठक मातोश्रीवर पार पडली. त्यामध्ये शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे याना विधानसभेच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी असा अंदाज व्यक्त केला जात होता की, आदित्य ठाकरे यांना हे पद मिळू शकते.

तसेच बुधवारी सुद्धा भाजपने त्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना विधिमंडळाच्या गटनेतेपदाची कमान सोपण्यात आली. दरम्यान विधानसभेसाठी शिवसेना-भाजपने युती करत निवडणूक लढवली. त्यामध्ये युतीला 161 जागांवर विजय मिळवता आला. तर भाजपने 105 जागा आणि शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळवता आला आहे.