दक्षिण मुंबईमध्ये आल्यानंतर आतापर्यंत गेटवे ऑफ इंडिया, राणीची बाग अशी काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच काही वास्तू पाहता येत होत्या. मात्र या मुंबईचा कारभार पाहणारी श्रीमंत पालिकेच्या यादीमधील बीएमसीचं मुख्यालय (BMC Headquarters) आता पर्यटक आणि मुंबईकरांना खुलं होणार आहे. आज 28 जानेवारी दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन केले जाणार आहे.
सीएसएमटी स्टेशन नजिक 150 वर्षांचा इतिहास असलेली मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीमध्ये आता गाईड सह टूर करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. या इमारतीच्या बाजूला मध्य रेल्वेचे मुख्यालय देखील आहे. या दोन्ही वास्तू आता पर्यटकांना पाहता येतील. बीएमसीची जुनी वास्तू 4 मजली तर त्याला जोडून 6 मजली दुसरी वास्तू आहे. ही टूर शनिवार-रविवार उपलब्ध असेल. Jail Tourism: महाराष्ट्रातील तुरुंग पर्यटनासाठी खुले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'येरवडा जेल' पासून सुरुवात.
युनेस्कोने बीएमसीच्या या ऐतिहासिक इमारतीला 2005 सालीच जागतिक पुरातन वास्तूचा दर्जा दिला होता. मात्र ही वास्तू आतमधून पाहण्याची सोय नव्हती. रेखीव, नाजूक नक्षीकाम, जुन्या पद्धतीच्या खिडक्या, गोलाकार भक्कम जिन्यांसह या वास्तूचा इतिहास जाणून घेण्यासाठी आता पर्यटकांना त्याचं भव्य रूप न्याहाळण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान बीएमसी आणि एमटीडीसी यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी याबाबत करार झाला होता. आता अखेर हे स्वप्न साकार होत आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. या स्वप्ननगरीला भेट देण्यासाठी देशा-परदेशातून कोट्यावधी पर्यटक येत असतात. त्यामुळे आता त्यांना मुंबईचा कारभार चालणार्या वास्तूला देखील भेट देण्याची संधी मिळणार आहे.