
सध्या मुंबईत (Mumbai) घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा कचरा डबा असून ही त्यात कचरा न टाकता निघून जाणे हे प्रकार आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. तर वाढत्या कचऱ्यामुळे प्रदुषण होत असून विविध आजारांना आमंत्रण दिले जाते. यामुळेच आता मुंबई महापालिका आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने कचरा मुक्त अभियान सुरु करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत कोणी घाण करताना आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
सध्या महापालिकेच्या 24 वॉर्डांमधील एकूण 94 पोलीस स्थानकातील पोलिसांच्या मदतीने प्रत्येक शनिवारी आणि रविवारी स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक वॉर्डसाठी 200 जणांची टीम तयार करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नालेसफाई, झोपडपट्टी येथील भागांसह अन्य ठिकाणी साफसफाई करणार आहेत.(नवी मुंबई: सार्वजिक ठिकाणी थुंकल्यास नागरिकांना भरावा लागणार 250 रुपयांचा दंड)
तसेच महापालिकेचे क्लिनअप मार्शल उघड्यावर घाण करणाऱ्या व्यक्ती, थुंकणे किंवा नदी नाल्यात कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवून असणार आहे. त्यानुसार नागरिकांकडून दंड वसूली सुद्धा केली जाणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांनी घाण केल्यास 10 हजार रुपयांपर्यंत दंड वसूली करण्यात येणार आहे.