बेस्ट कर्मचारी वेतनकरार मुद्द्यावरुन आता बेस्ट (BEST) कर्मचारी संघटनांमध्येचे एकवाक्यता नसल्याचे पुढे येत आहे. वेतनकरारावरुन सुरु असलेल्या संघर्षात तोडगा काढण्यासाठी बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट प्रशासनामध्ये सामंजस्य करार झाला. हा करार कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत होता. असे असले तरी हा करार झाला असतानाच बेस्ट वर्कर्स युनियनने (BEST Union) वेतनावरुन 9 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. संपाच्या भूमिकेबाबत प्रशासनाला नोटीस पाठवून कल्पनाही दिली आहे.
बेस्ट वर्कर्स युनियन मागण्या
- बेस्ट कामगारांना पालिका कर्मचाऱ्यांस २०१६-१७, १७-१८, १८-१९ मध्ये जाहीर झालेल्या दिवाळी बोनसइतकी रक्कम देण्यात यावी.
- अनुकंपा भरती तातडीने सुरू करण्यासह बेस्ट बसचा ताफा ३,३३७ इतका करण्यासाठी उपक्रमाने तातडीने स्वत:च्या मालकीच्या बस घ्याव्यात
- बेस्ट उपक्रमाच्या आस्थापना सूचीवरील पदसंख्येनुसार रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात.
(हेही वाचा, मुंबई: खुशखबर! आजपासून BEST चा प्रवास स्वस्त, किमान बस भाडे फक्त 5 रुपये)
दरम्यान, बेस्ट युनियनने प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. परंतू, यात सात मागण्या प्रमुख आहेत. या सातपैकी एक मागणी अशी आहे की, युनियनतर्फे १६ मे २०१६, ६ ऑगस्ट २०१९ रोजी सादर केलेल्या पर्यायी मागण्यांच्या पत्राच्या आधारे बेस्ट वर्कर्स युनियनसोबत वाटाघाटी करण्यात याव्यात त्यानुसार तोडगा काढण्यात यावा. बेस्ट वर्कर्स युनियनसोबत प्रशासनाचा अंतिम करार होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये इतकी अंतरिम वाढ देण्यात यावी अशीही मागणी युनियनने केली आहे. तसेच, मुंबई पालिकेचा बेस्ट उपक्रमासंबंधित 'क' अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशीही मागणी बेस्ट वर्कर्स युनियनने केली आहे.