बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमानुसार भाऊबीजेच्या (Bhaubeej) दिवशी म्हणजेच मंगळवारी, 146 जादा बसेस (Extra BEST Bus) चालविण्यात येणार आहेत. भाऊबीजेचा दिवस हा दिवाळीचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी अनेक लोक नातेवाईक-मित्रांना भेटण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे निर्माण होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टने जादा बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहरासोबत, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये या बसेस धावणार आहेत. सार्वजनिक वाहतुकीस प्रोत्साहित करण्यासाठी गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकांच्या बाहेर, बस आणि विशेस बस निरीक्षक तैनात केले जातील.
बेस्टचे उप प्रवक्ते मनोज वराडे यांनी दिलेल्या वृत्तानुसार, मीरा रोड, भाईंदर, माथेरान चौक (ठाणे), कोपरी (ठाणे), कॅडबरी जंक्शन (ठाणे), रेतीबंदर, कळवा, नवी मुंबई, वाशी, कोपरखैरणे, नेरूळ, ऐरोली, घणसोली आणि बेलापूर सीबीडी या ठिकाणी या जादा बसेस धावणार आहेत. बेस्टने अलीकडेच आपल्या ताफ्यात छोट्या एसी बसेस समाविष्ट केल्या आहेत. यामुळे अधिकाधिक प्रवासी बेस्टच्या बसने प्रवास करण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, पुढील काही महिन्यांत बेस्ट उपक्रमात अशा प्रकारच्या 1000 एसी आणि नॉन-एसी मिनी बस जोडल्या जातील. (हेही वाचा: Bhaubeej 2019: जाणून घ्या बहिणीला अखंड सौभाग्य आणि भावाला उदंड आयुष्य लाभण्यासाठी भाऊबीजेच्या दिवशी काय करावे)
21-सीट आणि 7 उभे राहतील इतकी क्षमता असणार्या या बसेसचे गेल्या महिन्यात उद्घाटन झाले होते. बेस्टने या बसेस फीडर मार्गांवर चालविण्याची योजना आखली आहे. मोठ्या गृहनिर्माण संस्था, रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानकांशी या बसेस जोडल्या जातील. या बसेसचा आकार लहान असल्याने जास्तीत जास्त अंतरापर्यंत या बसेस धावू शकतील.