Gateway of India (Photo Credits-ANI)

पुढील आठवड्यात मुंबईमध्ये (Mumbai) होणाऱ्या G20 परिषदेच्या बैठकीपूर्वी (G20 Council Meetings) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी प्रशासनाला 'मिशन मोडमध्ये शहर परिवर्तनासाठी' मुंबईतील सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यास सांगितले आहे. आढावा घेतल्यानंतर गुरुवारी मुंबईच्या सुशोभिकरणाच्या सुमारे 187 कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. शिंदे यांनी गेल्या चार महिन्यांत मुंबईच्या सुशोभिकरणाच्या कामाला गती दिली आहे.

रस्त्यांचे काँक्रिटीकरण, कोळीवाडय़ांचे सुशोभीकरण, आपला दवाखाना यासारख्या निर्णयांमुळे गतिमान मुंबईच्या वैभवात भर पडणार आहे. G20 परिषदेच्या बैठका महाराष्ट्रात होत असून पहिली बैठक मुंबईत होत आहे. ही शहरासाठी आणि राज्यासाठी सन्मानाची बाब असेल आणि त्यासाठी मुंबईचा कायापालट आणि ब्रॅंडींग जोरदार व्हायला हवे. स्वच्छतेला प्राधान्य देऊन मुंबईचे स्वरूप बदलण्यासाठी 5000 सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे शिंदे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या इमारतींवर रोषणाई करण्यात यावी, महत्त्वाचे रस्ते, चौक, स्कायवॉक, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण करण्यात यावे व ही सर्व कामे मिशन मोडवर हाती घेण्यात यावीत असेही ते म्हणाले. महानगरातील स्वच्छतागृहांच्या बांधकामाला गती द्यावी. त्याचबरोबर ईस्टर्न एक्स्प्रेस वे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर अद्ययावत स्वच्छतागृहांचे बांधकाम तातडीने करण्यात यावे. शहरातील स्कायवॉक उजळले पाहिजेत, असेही शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईतील रस्ते, समुद्रकिनारे, स्वच्छतागृहे यांची सातत्याने स्वच्छता झाली पाहिजे. त्यासाठी महापालिकेने शहराच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री आणि उपकरणे ओळखून घ्यावीत. स्वच्छतेबाबत जगातील सर्वोत्तम संकल्पना मुंबईत राबविण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. कम्युनिटी वॉशिंग मशीन ही संकल्पना झोपडपट्टी भागात राबवायला हवी, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

राज्याच्या सांस्कृतिक कलेची ओळख परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांना व्हावी, यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 13 डिसेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया जवळील हॉटेल ताज येथे महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित कार्यक्रम सादर होणार आहेत, तर दिनांक 14 डिसेंबर रोजी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक टेरेन्स ॲन्ड लुईस यांचे सादरीकरण असलेला कार्यक्रम वांद्रे येथील हॉटेल ताज एन्ड येथे होणार आहे.

उद्योग विभागाच्या वतीने कार्यक्रमस्थळी तसेच मान्यवरांची निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणी असे एकूण 4 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील हस्तकला कलाकुसरीच्या वस्तू या ठिकाणी प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. (हेही वाचा: Mumbai: 'उघड्या मॅनहोलमुळे मृत्यू झाल्यास BMC अधिकारी जबाबदार'- Bombay High Court)

दरम्यान, भारताला प्रथमच जी-20 परिषदेचे अध्यक्षपद 1 डिसेंबर, 2022 ते 30 नोव्हेंबर, 2023 या कालावधीसाठी मिळाले असून त्यानिमित्त देशातील विविध ठिकाणी या परिषदेच्या बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात एकूण 14 बैठका होणार असून, बैठकांचा पहिला टप्पा मुंबई येथे 13 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.