मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे वाढ झपाट्याने वाढत आहे. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील (Mumbai) रिक्षा-टॅक्सीचालकांनी (Auto-Taxi) भाडेवाढ केली आहे. मुंबईच्या एमएमआर रिजनमध्ये ही भाडेवाढ लागू होणार आहे. या भाडेवाढीमुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. आधीच महागाईने पुरता हवालदिल झालेला सामान्य नागरिक आता रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीमुळे (Auto-Taxi Fares Hike) आणखी भरडला जाणार आहे. नव्या दरानुसार रिक्षा-टॅक्सीच्या दरात 3 रुपयांनी वाढ केली आहे.
नव्या दरानुसार, रिक्षाचे भाडे 18 वरुन 21 होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरून 25 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली. 1 मार्चपासून ही भाडेवाढ लागू होईल. तर 31 मे पर्यंत मीटर कॅलिबरेशन पूर्ण व्हायला पाहिजे, असं अनिल परब यांनी सांगितलं.हेदेखील वाचा- Petrol Diesel Price Today: सलग 12 दिवसांनंतर आज इंधनदरवाढीला ब्रेक; जाणून मुंबई सह महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील दर
मिळालेल्या माहितीनुसार, इंधन वाढीच्या निर्णयावर रिक्षा व टॅक्सी चालकांकडून आंदोलन पुकारण्यात येणार होते. मात्र आता भाड्यात वाढ करुन दिल्याने रिक्षा व टॅक्सी चालकांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे मात्र सर्वसामान्य नागरिकांना या फटका सहन करावा लागणार आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी आज (22 फेब्रुवारी) इंधनाच्या दरामध्ये आज कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे आज पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मुंबई मध्ये आज पेट्रोलचा (Petrol) दर 97 रूपये प्रतिलीटर आहे तर डिझेल (Diesel) चा दर हा 88.06 रूपये स्थिर ठेवण्यात आला आहे. दरम्यान जानेवारी आणि फेब्रुवारी महिना मिळून पेट्रोल 6.77 रूपयांनी महाग झाले आहे तर डिझेल या दोन महिन्यात 7.10 रूपयांनी महाग झाले आहे.