Petrol Diesel Price Today:  सलग 12 दिवसांनंतर आज इंधनदरवाढीला ब्रेक; जाणून मुंबई सह महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील दर
Petrol Price In India | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये मागील 10-15 दिवसांपासून वाढते इंधनाचे दर पाहून जनसमान्यांच्या बजेटचे बारा वाजले आहेत. मात्र आज मागील सलग 12 दिवसांच्या इंधनदरवाढीनंतर त्याला ब्रेक लागला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज (22 फेब्रुवारी) इंधनाच्या दरामध्ये आज कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे आज पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मुंबई मध्ये आज पेट्रोलचा (Petrol) दर 97 रूपये प्रतिलीटर आहे तर डिझेल (Diesel) चा दर हा 88.06 रूपये स्थिर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान जानेवारी आणि फेब्रुवारी महिना मिळून पेट्रोल 6.77 रूपयांनी महाग झाले आहे तर डिझेल या दोन महिन्यात 7.10 रूपयांनी महाग झाले आहे. इथे पहा महाराष्ट्रातील तुमच्या शहरामधील आजचे पेट्रोल, डिझेलचे दर!

आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रुडच्या किंमती 63 डॉलरच्या पार गेल्या आहेत. तर अमेरिकेत हिम वादळामुळे कच्चा तेलाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने भारतामध्ये किंमतींमध्ये वाढ पहायला मिळत आहे. तर सिंगापूर एक्सचेंजमध्ये तेलाचा भाव 0.38 डॉलरने वधारून 59.62 डॉलर वर पोहचली आहे. ब्रेंट क्रूडचा दर 0.25 डॉलरने वाढून प्रति बॅरेल 63.43 डॉलर इतका झाला आहे. (वाचा - Electric Vehicles: सर्व सरकारी अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अनिवार्य करावा- मंत्री नितीन गडकरी).

दरम्यान महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर आणि इतर घटकांमुळे दर हे कमी जास्त असू शकतात. त्यामुळे तुमच्या शहरातील आजचा दर पाहूनच बाहेर पडा. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या इंधन दरवाढीमुळे महागाई भडकण्याची शक्यता आहे. रिक्षा, टॅक्सीला देखील हे दर परवडत नसल्याने अधिक काळ काम करावे लागत आहे. दरम्यान त्यांच्या युनियन कडून देखील चक्काजामचा इशारा देण्यात आला आहे.